Friday, May 10, 2024
Homeनगरसंस्थान रूग्णालयातील सुरक्षा कर्मचारी करोनाबाधित

संस्थान रूग्णालयातील सुरक्षा कर्मचारी करोनाबाधित

संबंधित रूग्ण ममदापूरचा; कुटुंबातील 5 सदस्य तपासणीसाठी नगरला

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- शिर्डी शिवलगत निमगावातील भाजीविक्रेती महिलेसह तिच्या संपर्कात आलेल्या सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असताना तिच्या मुलाच्या संपर्कात आलेल्या संस्थान सुरक्षा कर्मचार्‍याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून त्यामुळे साईबाबा संस्थान सुरक्षा कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, सदरील भाजीविक्रेती महिलेच्या मुलाचा जोडीदार साईबाबा रुग्णालयात सुरक्षा कर्मचारी म्हणून काम करत असून त्याचा अहवाल रविवारी सायंकाळी पॉझिटीव्ह आल्याने संस्थानच्या दोघा सुरक्षा कर्मचार्‍यांना करोनाचा संसर्ग झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. संबंधित रुग्णांच्या घरच्या पाच सदस्यांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर गावातील 25 जण क्वारंटाईन करण्यात आले आहे.

निमगावातील भाजीविक्रेती महिला पॉझिटीव्ह आढळून आल्याने तिच्या कुटुंबातील सहा जणांना देखील करोनाचा संसर्ग झाला. शनिवारी सायंकाळी शिर्डीत वास्तव्यास असलेली तिची 53 वर्षीय व्यक्तीही करोना संक्रमित झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्रशासनाने शिर्डी शहर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला.
भाजीविक्रेत्या महिलेच्या मुलगा साईबाबा संस्थानमध्ये सुरक्षा विभागात काम करतो. त्याचा रिपोर्ट अगोदरच पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यापैकी त्याच्या संपर्कात आलेला त्याचा राहाता तालुक्यातील ममदापूर येथील जोडीदारास करोनाचा संसर्ग झाला असून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संस्थानच्या रूग्णालयात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबतची माहिती कळताच प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रमोद म्हस्के, डॉ. शरद गोर्डे यांनी सदरील व्यक्तींच्या कुटुंबातील माहिती घेऊन सदस्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी तातडीने दखल घेतली आहे.

साईबाबा संस्थानमध्ये सुरक्षा विभागात तसेच अन्य विभागात शेकडो अधिकार्‍यांसह हजारो कर्मचारी काम करत आहेत. त्यामुळे आता संबंधित सुरक्षा कर्मचार्‍याच्या संपर्कात आणखी किती जण आले याचा शोध घेण्याचे आव्हान संस्थान प्रशासन तसेच शासकीय यंत्रणेला आहे.

सदरचा कर्मचारी 28 मे रोजी साईबाबा रुग्णालयात कामावर येऊन गेल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. रुग्णालयात दर तासाला औषध फवारणी करण्यात येत असली तरी या दोन सुरक्षा कर्मचार्‍यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी पाठवले का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या