शिर्डीत प्रशासनाच्यावतीने रामनवमी उत्सव साजरा
Featured

शिर्डीत प्रशासनाच्यावतीने रामनवमी उत्सव साजरा

Sarvmat Digital

द्वारकामाई मंदिरातील गव्हाचे पोते बदलून त्याची विधीवत पूजन

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- श्रीसाईबाबा संस्थान च्यावतीने दि. 01 ते 03 एप्रिल 2020 याकाळात श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. काल रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी प्रशासनाच्यावतीने विविध धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान बाबांच्या हयातीपासून चालत आलेल्या द्वारकामाई मंदिरातील गव्हाचे पोते बदलून त्याची विधीवत पूजन करण्यात आली.

गुरुवार दि. 2 रोजी रामनवमी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने मंदिराच्या आत झेंडुच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. पहाटे 4.30 वाजता काकड आरतीनंतर पहाटे 5 वाजता व्दारकामाई मंदिरात अखंड पारायण समाप्ती व साईबाबांच्या फोटोची व श्रीसाईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक व्दारकामाईतून गुरुस्थानमार्गी समाधी मंदिरापर्यंत काढण्यात आली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी आकाश किसवे व प्रशासकीय अधिकारी अशोक औटी आदी उपस्थित होते. 5.30 वाजता श्रींचे मंगलस्नान करण्यात आले असून सकाळी 6.00 वाजता शिर्डी माझे पंढरपूर आरती झाली. त्यानंतर 6.15 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे व त्यांच्या पत्नी अंजली डोंगरे यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली. 6.45 वाजता लेंडीबागेतील शताब्दी ध्वज बदलण्यात आला.

7 वाजता समाधी मंदिरात मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे व त्यांच्या पत्नी सौ.अंजली डोंगरे यांच्या हस्ते गव्हाच्या पोत्याचे पुजन करुन व्दारकामाई मंदिरातील गव्हाचे पोते बदलण्यात आले. सकाळी 10 वाजता मंदिर विभागातील कर्मचारी संभाजी तुरकणे यांचे रामजन्म कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. दुपारी 12.15 च्या दरम्यान मध्यान्ह आरती झाली. सायंकाळी 4 वाजता व्दारकामाई मंदिरावरील निशाणे कर्मचार्‍यांच्या हस्ते बदलण्यात आली. तर सायंकाळी 6.30 वाजता धुपारती तसेच रात्री 10.30 वा. शेजारती झाली.

सदरील उत्सव कोरोनाच्या संकटामुळे स्थगित करण्यात आला असला तरी सुद्धा 109 वर्षांची परंपरा भक्तांविना कायम ठेवली. यावेळी संस्थानच्या अधिकार्‍यांनी पहिल्या दिवशी संचारबंदीचे उल्लंघन तसेच सोशल डिस्टस्निगंचा नियमांना धाब्यावर बसवले होते मात्र याबाबत वृत्तपत्रातून कानउघडणी केल्यानंतर प्रशासनाने कडेकोट पालन केल्याचे दिसून आले.

ग्रामस्थांना रामनवमीला साईबाबांच्या मंदिरात साईसमाधीचे दर्शन घेणे शक्य झाले नसल्याने ग्रामस्थांनी घरोघरी स्तवनमंजरी, साईचरित्र पारायणाचे पठण करुन बाबांचा आशिर्वाद घेतला. कोरोना राक्षसाला पळवून लावण्यासाठी सायंकाळी शिर्डी ग्रामस्थांनी प्रत्येक घरोघरी नऊ दिवे पेटवून साईबाबांना प्रार्थना केली.

शिर्डीत साईबाबा मंदिरात रामनवमी उत्सवाच्या पहिल्या दिवशी संस्थानचे अधिकारी, कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने एकत्र येवून पंतप्रधानांच्या आदेशाची पायमल्ली केली होती. याबाबत दैनिक सार्वमतने आवाज उठविला तरीही मात्र कालच्या मुख्य दिवशी मात्र सावरासावर करुन फोटोत जास्त लोक एकत्र दिसणार नाही याची काळजी घेतली. तरी उत्सवाच्या मुख्य दिवशीही अनेक अधिकारी कर्मचारी पुन्हा आदेशाला केराची टोपली दाखवत सगळीच बिना मास्कने एक़त्र जमले होते. महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिरात पुजार्‍यांनीच पूजा अर्चा करुन रामनवमी उत्सव साजरा केला. या उत्सवाची पूजाअर्चा केवळ दोन किंवा तीन पुजार्‍यांच्या हाती देवून या आदेशाचा मान या अधिकार्‍यांनी राखला असता.

Deshdoot
www.deshdoot.com