शिर्डीसह आसपासच्या 25 गावांत कडकडीत बंद
Featured

शिर्डीसह आसपासच्या 25 गावांत कडकडीत बंद

Sarvmat Digital

साईजन्मभूमीचा वाद : भाविकांची साईचरणी नतमस्तक होण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – मुख्यमंत्र्यांनी केलेल्या साईजन्मभूमीचा वाद चांगलाच चिघळला असून शिर्डीसह आसपासच्या 25 गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. मात्र या बंदचा साईभक्तांवर कोणताच परिणाम झाला नसून लाखोंच्या संख्येने भाविक साईचरणी नतमस्तक होण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र दिसून आले आहे.

दरम्यान, ग्रामस्थांनी शिर्डी शहर कडकडीत बंद करून रविवार दि.19 रोजी सकाळी दहा वाजता द्वारकामाई समोर सर्वधर्म सद्भावना परीक्रमा रॅलीसाठी शिर्डीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे, कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते, शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, ज्येष्ठ ग्रामस्थ ज्ञानेश्वर गोंदकर, साईनिर्माणचे अध्यक्ष विजय कोते, शिवसेना नेते कमलाकर कोते, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, ज्येष्ठ नगरसेवक अभय शेळके, गटनेते अशोक गोंदकर, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, नगरसेवक हरिश्चंद्र कोते, नगरसेवक सुजित गोंदकर, मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते, अ‍ॅड. अनिल शेजवळ, सामाजिक कार्यकर्ते नितीन कोते, माजी विश्वस्त सचिन तांबे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय शिंदे, राष्ट्रवादीचे रमेश गोंदकर, निलेश कोते, सुधाकर शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. एकनाथ गोंदकर, रामभाऊ कोते, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन कोते, सुनिल गोंदकर, भाजपचे रवींद्र गोंदकर, सर्जेराव कोते, मधुकर कोते, प्रमोद गोंदकर, भाऊ शिरगावकर, रवींद्र कोते, विकास गोंदकर, गणेश दिनूमामा कोते, जमादार शेख, गनीभाई आदींसह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

परीक्रमेची सुरुवात साईबाबांची आरती करून द्वारकामाईपासून पालखी मार्गाने काढण्यात आली. रॅलीत साईनामाचा घंटानाद करण्यात आला. ‘सबका मालिक एक’ घोषणांनी साईमंदीर परिसर दुमदुमून गेला होता. परिक्रमा रॅलीची सांगता नाट्यगृहाजवळ करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात पाथरीबाबत निषेध करत मनोगत व्यक्त केले. यावेळी खा.लोखंडे यांनी सांगितले की, शिर्डी ग्रामस्थ आणि विश्वस्तांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री यांची भेट घेऊन या वादावर नक्की तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असून मी शिर्डी ग्रामस्थाबरोबर आहे.

कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, संतांचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये, साईमंदिराचा विकास होण्यासाठी आमच्या विरोध नाही मात्र जन्मभूमी म्हणून आक्षेप आहे. नवनवीन शोध लावत नव्याने चरित्र लिहून काढायचे हे सर्व खोटे आहे. पहिल्या साईचरित्रास प्रमाण माणून धार्मिक तेढ निर्माण न होता तातडीने मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, शिर्डीतील साईमंदिरात समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आत्मिक समाधान मिळते. शिर्डी हेच श्रद्धास्थान आहे यास धक्का लागू नये. माझा शिर्डीकरांच्या बंदला पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान रविवारी सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी ठिकठिकाणी मोफत चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. एकंदरीतच शहरात शांततेत बंद सुरू असून भाविकांवर या बंदमुळे कोणताही परिणाम दिसून आला नाही. मात्र शिर्डी हीच बाबांची पुण्यभूमी असून मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान मागे घ्यावे असेही भाविकांनी सांगितले.

साईजन्मभूमी वादाबाबत शिर्डी शहरासह पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला असला तरीदेखील शिर्डीत भाविकांनी साई दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पहाटे काकड आरतीसाठी सुमारे दोन हजार भाविकांची उपस्थिती होती तर दुपारपर्यंत सुमारे 32 हजार भाविकांनी साईसमाधीचे दर्शन घेतले. भाविकांना तातडीने दर्शन मिळावे यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर सुरक्षा चोख ठेवण्यात आली. संस्थानच्या वतीने भक्तनिवासाच्या ठिकाणी मोफत चहा नाष्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.

तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी भाविकांसाठी मोफत चहा नाश्त्याची व्यवस्था केली होती यावेळी भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या वतीने आर.सी.पी. च्या दोन तुकड्या, स्ट्रायकिंग फोर्सची एक तुकडी, उपविभागीय कार्यालयातील लोणी, कोपरगाव येथील पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यासह 150 पोलीस व 12 अधिकारी यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सोमवारी दुपारी दोन वाजता राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी साईजन्मभूमी वादावर तोडगा काढण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांची बैठक आयोजित केली असून साईबाबा संस्थानकडे असलेल्या सर्व मूळ दस्तावेज घेऊन आम्ही उपस्थित राहणार आहोत. दरम्यान शिर्डी बंदबाबत आम्ही मुख्यमंत्री कार्यालयास कळविले आहे. साईचरित्राची आठवी आवृत्ती संस्थानकडून गहाळ झाल्याची माहिती मिळाली असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले की साईचरित्राची रचना हेमाडपंतीयांनी केली असून 1930 मध्ये पहिली आवृत्ती मुद्रित झाली आहे. साईबाबा संस्थानच्या वतीने साईचरीत्राच्या आजपर्यंत एकूण 36 आवृत्त्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. साईचरित्रकार गोविंद दाभोलकर यांच्या नात रजनी दाभोलकर यांनी सर्व मूळ दस्तावेज संस्थानला सुपुर्द केल्या आहेत. प्रत्येक आवृत्तीच्या पाच प्रती संस्थानकडे उपलब्ध आहेत.
– दीपक मुगळीकर – मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान

शांततेने चर्चा करून हा प्रश्न सोडवावा – ना. भुजबळ

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – धार्मिक स्थळाचा वापर राजकारणी लोकांनी वाद निर्माण करण्यासाठी करू नये. साईबाबा सर्वधर्म समभावाचे प्रतीक असल्याने वाद न वाढवता शांततेने चर्चा करून हा प्रश्न सोडविण्यात यावा, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शिर्डीत केले.

ना. छगन भुजबळ यांनी रविवारी सायंकाळी धूपारतीपूर्वी साईदरबारी हजेरी लावत साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी ना. भुजबळ यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते, तालुका उपाध्यक्ष सुधाकर शिंदे, अमित शेळके, प्रसाद पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ना. भुजबळ यांनी सांगितले की, साईबाबांच्या दर्शनाला देशविदेशांतून लाखो साईभक्त येत असतात. साईबाबा त्यांना संकटातून मुक्त करण्याचे काम करतात. त्यामुळे साईबाबा कधी संकटात सापडत नाहीत. शिर्डी बंद करून प्रश्न सुटणार नाही. याबाबत सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली असून ते दोन्ही बाजूंची भूमिका समजावून घेऊन त्यावर भाष्य करणार आहेत.

साईबाबा सर्व जाती व धर्माचे असल्याने त्यांचे देश-विदेशात हजारो मंदिरे आहे. ‘सबका मालिक एक’ असे साईबाबांचा संदेश असल्याने सर्व रंगांच्या झेंड्यांचे लोक शिर्डीला दर्शनासाठी येत असल्याने या वादात कुणीही राजकारण न करता प्रश्न समोपचाराने सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले. यावेळी सर्वांना शांतता पाळण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. ज्ञानेश्वरांनी सांगितले होते ‘हे विश्वचि माझे घर’ त्याच पद्धतीने साईबाबांनी काम केले आहे. अगोदरच देशात मोठे वाद आहे त्यामुळे हा वाद विकोपाला देऊ नये असे मला वाटते.

साईबाबा जन्मस्थळ संदर्भात वक्तव्य करणे हे मुख्यमंत्र्यांचे काम नाही, त्यांनी केलेले वक्तव्य कुठलीही शहानिशा न करता गैर आहे. हे वाक्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ मागे घ्यावे. साई जन्मभूमी वादावर शिर्डी बदला पाठिंबा असून आजच्या बंदला भाविकांची गैरसोय झाल्याने यास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. हा राजकीय वाद असून हे बरोबर नाही त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य तातडीने मागे घेण्यात यावे. हे तीन पक्षांचे सरकार जेव्हापासून स्थापन झाले तेव्हापासून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करीत आहे. राज्याच्या विकासासंदर्भात अजून निर्णय नाही. राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे कोणी कोणाचे ऐकत नाही. मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना आमंत्रित करण्याच्या अगोदर प्रथम त्यांनी आपले विवादित भाष्य मागे घ्यावे नंतरच ग्रामस्थांना बोलवावे.
– प्रा. राम शिंदे, माजी मंत्री

मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील – अजित पवार

शिर्डीकरांनी आपला बंद मागे घ्यावा यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शिर्डीकरांना बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. साईबाबांच्या जन्मस्थान वादावर मुख्यमंत्र्यांनी उद्या बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांनी पाथरी आणि शिर्डीच्या नागरिकांना कोणाच्याही भावना न दुखवता चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांप्रमाणे मी देखील सर्वांना चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन करतोय. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेतील. मुख्यमंत्री या बैठकीत पाथरी आणि शिर्डीच्या लोकांचे म्हणणं ऐकून त्यावर योग्य निर्णय घेतील, असे अजित पवार म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com