Wednesday, April 24, 2024
Homeनगरपाथरी जन्मभूमी नाहीच…साईंची शिर्डी मध्यरात्रीच ठप्प !

पाथरी जन्मभूमी नाहीच…साईंची शिर्डी मध्यरात्रीच ठप्प !

ग्रामसभा : नेते व ग्रामस्थ आक्रमक, निर्णयाशिवाय माघार नाही

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – साईजन्मभूमीबाबत उकरून काढण्यात आलेल्या वादावर शिर्डीकर आक्रमक झाले असून बेमुदत शिर्डी बंदच्या माध्यमातून तीव्र विरोध सुरू केला आहे. मध्यरात्रीच शिर्डीकरांचा बंद सुरू झाला आहे. पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी नाहीच, यावर ठाम भूमिका घेत शनिवारच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी चार ठरावही संमत केले आहेत. दरम्यान, ग्रामसभेत नेते व ग्रामस्थांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत या वादाबाबात तीव्र नापसंती व्यक्त केली.

- Advertisement -

शिर्डी ग्रामस्थांच्यावतीने शनिवारी सायंकाळी सहा वाजता द्वारकामाई समोर ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेचे अध्यक्षपदी सुधाकर शिंदे होते तर शिर्डी ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिर्डीतील सर्व नगरपंचायतीचे पदाधिकारी, दूधसंघ, सोसायटी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुमिका मांडली. ते म्हणाले, साईजन्माचा सुरू केलेला वाद हा हेतूपुरस्कर असून बाबांनी कधी कोठे याबाबत उल्लेख केलेला नाही.

देशविदेशात हजारो साईमंदिरे उभी राहिली आहेत. पाथरी मंदिर त्याचाच एक भाग आहे. ब्रिटिशांनी सुद्धा सगळं शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना काही मिळाले नाही. शिर्डी ग्रामस्थांची भूमिका कोणा विरोधात नाही, विनाकारण जन्मस्थळाचा मुद्दा उपस्थित करणार्‍या प्रवृत्तीचा मी जाहीर निषेध करतो. शासनाने या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी. शिर्डीकरांनी पुकारलेल्या बंदला पूर्ण पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कैलासबापू कोते यांनी सांगितले की, शासनाने पाथरी गावाला दत्तक घेतले तरी चालेल. त्याचप्रमाणे त्या गावाला सोन्याचे कंपाउंड करून घ्यावे. आ.दुर्रानी यांनी साई समाधीजवळ पाच मिनिटे बसावे. त्यांच्या मनातील पाप धुतले जाईल. साईजन्मभुमीचा वाद निर्माण करून सर्वधर्म समभावाच्या प्रतिमेला हरताळ फासू नका, असेही त्यांनी आ.दुर्रानी यांना बजावले.

पंचक्रोशीतील गावांनी शिर्डी बंदला पाठिंबा देत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहिर निषेध व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शिर्डीतील साईभक्त तात्या पाटील यांचे वंशज मुकुंदराव कोते, माजी विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, ज्येष्ठ नगरसेवक अभयराजे शेळके, भाजपचे शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, दिलीप संकलेचा, म्हाळसापतीचे पणतू दीपक नागरे, गणीभाई, मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते, सामाजिक कार्यकर्ते नितीन कोते, भाजपचे रवींद्र गोंदकर, सचिन शिंदे, साईबाबा संस्थानचे मुख्य पुजारी भा.रा. जोशी गुरू, राहाता येथील राजेंद्र वाबळे, एकरुखेचे दिलीप सातव, सावळीविहिरचे ओमेश जपे, निघोज येथील अनिल मते, नपावाडीचे अशोक धनवटे, केलवडचे गंगाधर गमे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन सुजित गोंदकर यांनी केले तर आभार मनीलाल पटेल यांनी मानले.

भावनांशी सहमत – थोरात
साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत निर्माण झालेल्या मुद्यावर समस्त ग्रामस्थांनी शिर्डी बंदची हाक दिली आहे. शिर्डी ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय योग्य असून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यांच्या भावनांशी सहमत आहोत, असे काँग्रेसचे नेते सुरेश थोरात यांनी कळविले आहे.

ग्रामसभेचा ठराव

ग्रामसभेचे अध्यक्ष सुधाकर शिंदे यांनी ठरावाचे वाचन केले. हे ठराव असे

1.पाथरीला निधी देण्यास विरोध नसून केवळ जन्मभूमी उल्लेख करण्यास आमचा आक्षेप आहे.
2. अन्य इतर आठ जन्मस्थळांच्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही.
3. साई जन्मभूमीबाबतचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी मागे घ्यावे. जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत बेमुदत शिर्डी बंद राहील.
4. भाविक आपल्यासाठी देवच आहेत. त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.
या ठरावास ग्रामस्थांनी संमती दिली.

चर्चेला आमने-सामने या !
शिवसेनेचे कमलाकर कोते म्हणाले, पाथरीकरांनी सांगितले की आमच्याकडे जन्मस्थळाबाबत 29 पुरावे आहेत. शिर्डीकरांकडेही 30 पुरावे आहेत. या संदर्भात एखादे मध्यवर्ती ठिकाण निवडून आमने-सामने बैठक घ्यावी. साईबाबा माझे नातेवाईक आहेत असा दावा करायला 170 वर्षांत पाथरीचा एकही माणूस शिर्डीत आला नाही, असेही त्यांनी सांगितले.

आज परिक्रमा
रविवारी सकाळी शिर्डी ग्रामस्थ द्वारकामाई येथून परीक्रमा काढणार आहेत. शहरातून फिरणार्‍या या परिक्रमेत साईचरीत्रातील ओव्यांंचे फलक हातात घेऊन साईजन्मभुमीबाबत कुठेही उल्लेख नसल्याचा संदेश दिला जाणार आहे. परिक्रमेची सांगता द्वारकामाई येथे होईल, अशी माहिती ग्रामसभेत देण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या