शिर्डीतून चिमुरडीस चोरून नेले
Featured

शिर्डीतून चिमुरडीस चोरून नेले

Sarvmat Digital

चार पथकांकडून कसून शोध

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- अवघ्या जगाला सर्वधर्मसमभावाची शिकवण आणि श्रद्धा व सबुरीचा संदेश देणार्‍या साईबाबांच्या शिर्डी नगरीतून पाच महिन्यांच्या दुर्गा नामक चिमुरडीस एका अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या शोधात शिर्डी पोलिसांनी चार पोलीस पथके रवाना केली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली

शिर्डी शहरातील कनकुरी रोडलगत असलेल्या खाजगी पार्किंगमध्ये मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील सीमा रावत नामक महिला आपल्या चार छोट्या मुलींसह किरकोळ हातविक्री करून मुलांचे पोट भरत होती. ही महिला प्रसादालयासमोरील पार्किंगमध्ये मंगळवार दि. 18 रोजी दुपारच्या सुमारास आपल्या पाच महिन्यांच्या दुर्गा या चिमुरडीला झोळीत झोपी लावून अंघोळीसाठी गेली असता यादरम्यान एका अज्ञात इसमाने त्याठिकाणी येऊन झोळीतून हे पाच महिन्यांचे बाळ उचलून चोरून नेल्याची घटना घडली.

यावेळी बाळाजवळ महिलेची अंदाजे वय दहा ते अकरा वर्षाची मोठी मुलगी हजर होती. मात्र त्या मुलीला सदर इसमाबद्दल विचारले असता तिने त्याचे वर्णन लंगडा व लांब केस असल्याचे सांगितले. मात्र आपली छोटी बहिण झोळीतून काढून नेत असताना तिने त्या व्यक्तीला कुठल्याच प्रकारचा अटकाव केला नाही.

काही वेळाने सदर महिला आंघोळ करून परतल्यावर बाळ झोळीत न दिसल्याने तिने आरडाओरडा करत शिर्डी पोलिसांत धाव घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, शिर्डी पोलीस ठाण्याचे प्र. सहा पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, सहा पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान सी.सी.टी.व्ही फुटेज तपासले असता सदर व्यक्ती झोळीतून या पाच महिन्याच्या बाळास काढून नेतांना कैद झाला आहे. फिर्यादी महिला सीमा रावत यांच्या तक्रारीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून शिर्डी पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी चार पोलीस पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली. दरम्यान या घटनेमुळे शिर्डी पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणी कसून तपास करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com