Saturday, April 27, 2024
Homeनगरमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद

मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- संपूर्ण जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणार्‍या साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेखावरून शिर्डी ग्रामस्थ व साईभक्तांनी तिव्र संताप व्यक्त करून साईबाबांच्या विचाराला हरताळ फासणार्‍या तथाकथीत प्रवृत्तीच्या विरोधात मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी येत्या रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय शिर्डी ग्रामस्थांच्या बैठ्ठकीत एकमताने घेण्यात आला. व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी तातडीने शिर्डीत शनिवारी ग्रामसभा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौर्‍यावर असताना काही लोकांनी साईबाबांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केली. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच्या विकासासाठी राज्य सरकारने विकास आराखडा तयार केला असून त्याचे भुमीपूजन लवकरच केले जाईल अशी घोषणा केल्यानंतर देश विदेशातील साईभक्तांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि शिर्डी ग्रामस्थही आक्रमक झाले आहेत.

- Advertisement -

साईबाबांचा जन्म,धर्म याबाबत साईचरित्रात स्पष्ट लिहिलेले असतानाही अनेक ठीकाणी साईबाबांच्या जन्मस्थानाबाबत दावे प्रतिदावे केले जात असून त्यातून साईबाबांच्या सर्वधर्म समभावाच्या विचारालाच नख लावण्याचा प्रयत्न होत आहे.

काही लोकांनी तर साईबाबांना विशिष्ट धर्मात अडकवण्याचा चावलेला प्रयत्न निंदनीय असल्याची भावना शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केली. साईबाबांनी आयुष्यभर फकिराच्या वेशात राहुन दिनदुबळ्यांची सेवा केली. जगाला सर्व धर्मसमभावाची शिकवण दिली. आपला धर्म,पंथ,जन्म याबाबत कोठेही वाच्छता केली नाही. साईबाबांच्या जीवन कार्याबद्दल साईसतचरित्र हेच एकमेव दस्तऐवज असून त्यात कुठेही साईंच्या जन्मस्थळाचा अथवा ते कोणत्या जातीचे होते याबाबत कुठेही नोंद नाही.

असे असतानाही पाथरी येथील काही प्रवृत्ती साईबाबा विशिष्ट जातीचे असल्याचा दावा करून साईभक्तांच्या भावनेला व साईबाबांच्या विचारधारेला नख लावण्याचा प्रयत्न करित आहेत. त्यांच्याकडे साईबाबांच्या जन्मस्थळाचा कोणताही अधिकृत पुरावा नसताना सरकार साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून पाथरीचा विकास करण्याला आक्षेप साईभक्त तसेच शिर्डीकरांनी घेतला आहे. पाथरीचा ज़रूर विकास करा पण जन्मस्थळाच्या नावाला शिर्डी करांचा विरोध आहे.

साईबाबांच्या पाथरी येथील जन्मस्थळाच्या उल्लेखावरून साईभक्त आणी शिर्डी ग्रामस्थांमध्ये असंतोष उसळला असून आज गुरूवारी शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थांची शिर्डी नगरपंचायतमध्ये बैठक होवून साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणार्‍या पाथरी आणी अन्य ठीकाणच्या तथाकथीत लोकांचा तिव्र निषेध करून यापुढे साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणार्‍यांचा सरकारने बंदोबस्त करावा यासाठी येत्या रविवार पासुन बेमुदत शिर्डी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी नगराध्यक्षा अर्चनाताई कोते ,प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, साईनिर्माणचे अध्यक्ष विजय कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, जेष्ठ नगरसेवक अभय शेळके, नगरसेवक शिवाजी गोंदकर, नगरसेवक सुजित गोंदकर, नगरसेवक हरीश्चंंद्र कोते, दत्तात्रय कोते, भाजपचे तालुका सरचिटणीस रवींद्र गोंदकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष रमेश गोंदकर, तुकाराम गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते नितीन कोतेे, सुनील गोंदकर, प्रमोद गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश दिनुमामा कोते, विजय जगताप, सुधाकर शिंदे,गणीभाई, जमादार इनामदार,दिपक वारूळे, तानाजी गोंदकर शफीकभाई शेख आदी प्रमुख ग्रामस्थ उपस्थीत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या