शिर्डी विमानतळावरून विमान उड्डाण रद्द
Featured

शिर्डी विमानतळावरून विमान उड्डाण रद्द

Sarvmat Digital

रांजणगाव देशमुख (वार्ताहर)- 24 मार्च पासून बंद असलेली शिर्डी विमानसेवा 25 मे पासून शिर्डी हैदराबाद विमानसेवेने सुरू होणार होती. मात्र सोमवारचे पहिले विमान उड्डाण रद्द करण्यात आले. त्यास शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी दुजोरा दिला आहे. मंगळवार व बुधवारचेही विमान उड्डाण रद्द झाल्याचे समजते.

हैदराबादवरून दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनी विमान शिर्डी विमानतळावर येणार होते तर दोन वाजून पाच मिनिटांनी हैदराबादकडे जाणार होते. यासाठी काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळावर करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी करण्यात आली होती. जिल्हाधिकारी व जिल्हापोलीस प्रमुखांनी विमानतळावर भेट देऊन संपूर्ण आढावा शनिवारी घेतला होता. विमानाने शिर्डीत येणार्‍या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरण ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. शिर्डी येथील साईआश्रम धर्मशाळेत विलगीकरणाची व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे.

विमानतळावरच सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. दहा दिवस संस्थात्मक विलगीकरण व नंतर सात दिवस होम क्वारंटाइन करण्यात येणार आहे.
दि. 25 मे पासून देशांतर्गत विमानसेवा सुरू केली जाणार यामुळे शिर्डी आंतराष्ट्रीय विमानतळावर पहिले विमान हैद्राबाद शिर्डी येण्याचे निश्चीत झाले होते. यासाठी हैद्राबाद येथून येणार्‍या 29 प्रवाशांनी बुकींग केले होते. येणार्‍या प्रवाशांची यादी देखील महसूल प्रशासनास प्राप्त झाली होती. यात जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर अशा जिल्ह्यांतील व्यक्तींचा समावेश होता तर परतीच्या प्रवासात तीन व्यक्तींनी बुकींग केले होते.

सोमवारचे शिर्डी हैदराबाद हे विमान प्रवासी संख्या कमी असल्या कारणाने रद्द झाल्याचे समजते तर मंगळवार व बुधवारचेही विमान रद्द झाल्याचे समजते. सुरुवातीला फक्त शिर्डी-हैदराबाद एवढे एकच विमान शिर्डी विमानतळावरून येणार व जाणार होते. आता हे उड्डाण गुरुवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com