Wednesday, April 24, 2024
Homeनगरशिर्डीतून उद्यापासून विमानसेवा

शिर्डीतून उद्यापासून विमानसेवा

सुरुवातीला शिर्डी-हैदराबाद विमानाचे उड्डाण

रांजणगाव देशमुख (वार्ताहर)– करोऩामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असेलेले शिर्डी विमानतळ उद्या दिनांक 25 मे पासून सुरू होणार आहे. सुरुवातीला फक्त इंडीगोएअर लाईनचे शिर्डी-हैदराबाद हे एकच विमान चालू होणार आहे. तशी तयारी शिर्डी विमानतळ प्रशासनाने केली आहे. त्याची पाहणी शनिवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह यांनी केली आहे अशी माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी दिली आहे.

- Advertisement -

मार्च महिन्याच्या 24 तारखेपासून विमानसेवा पूर्णतः बंद करण्यात आली होती. आता शासनाने चौथ्या लॅाकडाऊनमध्ये काही नियम शिथील केले आहेत. त्यामुळे देशांंतर्गत काही अटीवर विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. शिर्डी विमानतळावरून सुरुवातीला फक्त हैदराबादला जाणारे एक व येणारे एक अशीच विमानसेवा सुरू होणार आहे. ही सेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार व रविवारी सायंकाळी तर मंगळवार, गुरुवार, आणि शनिवारी सकाळी सुरू राहणार आहे. त्यासाठीची बुकींग सुरू करण्यात आली आहे.

काकडी येथील शिर्डी विमानतळावर फिजीकल डिस्टन्ससाठीची उपाययोजना करण्यात आली आहे. बोर्डींग पाससाठीच्या ठिकाणी उभे राहण्यासाठी अंतराअंतरावर चौकोन करण्यात आले आहेत. तसेच वेटींगरुममध्ये असलेल्या खुर्च्यांवर ठराविक अंतर ठेऊन बसण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे. संपूर्ण विमानतळ परिसर निर्जंतुकीकरण केले आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा पोलीस प्रमुख इशु सिंधू यांनी विमानतळावर येऊन केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. फिजीकल डिस्टन्स तसेच करोनासंदर्भात करावयाच्या उपाययोजनासंदर्भात विमानतळ प्राधिकरणास सूचना केल्या आहेत. टर्मीनल व्यवस्थापक एस मुरलीकृष्णा यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी शिर्डीचे प्रांताधिकारी, तहसीलदार कुंदन हिरे, तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस उपअधीक्षक वाकचौरे, पोलीस निरीक्षक, शिर्डी विमानतळाचे आधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या