शिवरात्री सप्ताह पत्रिकेवरून दंगा
Featured

शिवरात्री सप्ताह पत्रिकेवरून दंगा

Sarvmat Digital

राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष आरोपी । शिराढोणची घटना

अहमदनगर (प्रतिनिधी) – महादेव मंदिर सप्ताहाच्या पत्रिकेत नाव न छापल्याच्या कारणातून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. त्यात तिघे जखमी झाले असून पोलिसांनी 25 जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. नगर तालुक्यातील शिराढोण येथे सोमवारी ही घटना घडली.

राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दादा ऊर्फ गहिनीनाथ किसन दरेकर, सोनू ऊर्फ सुनील राजेंद्र दरेकर, किशोर माणिक रोहोकले, रमेश भाऊ वारे (सर्व रा. शिराढोण), गजानन भांडवलकर (वाकोडी फाटा), अक्षय भिंगारदिवे (दरेवाडी) आणि इतर 20 अशी गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत. रामदास छबुराव वाघ, जगदीश रामदास वाघ आणि सुधीर मोहन वाघ अशी जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.

रामदास छबुराव वाघ यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. शिराढोण गावात महादेव मंदिर असून शिवरात्रीनिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या कार्यक्रम पत्रिकेत दरेकर यांचे नाव नव्हते. त्यामुळे पुन्हा नव्याने पत्रिका छापण्यात आल्या. गावात पत्रिका वाटप करताना मात्र जुन्याच (दरेकर यांचे नाव नसलेल्या) वाटल्या गेल्या. त्या रागातून दरेकर यांनी वाघ यांना शिवीगाळ करत मारहाण केली. परसराम अशोक वाघ यांच्या हॉटेलची तोडफोड करत नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com