शिंगणापूरच्या पोलीस अधिकार्‍यांकडून अरेरावी
Featured

शिंगणापूरच्या पोलीस अधिकार्‍यांकडून अरेरावी

Sarvmat Digital

देवस्थान विश्वस्तांचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

सोनई (वार्ताहर)- शनीशिंगणापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी देवस्थानचे विश्वस्त, कर्मचारी व व्यवस्थापन यांच्याबरोबर असभ्य वर्तन करून पदाचा गैरवापर करत असल्याची तक्रार शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देऊन केली असून सदर अधिकार्‍याविरुद्ध त्वरीत चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले की, शिंगणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण हे देवस्थानच्या कारभारात ढवळाढवळ करत असून देवस्थानच्या सुरक्षा विभागामध्ये हस्तक्षेप करत आहेत. देवस्थानची सुरक्षा ही सक्षम असून सुरक्षा अधिकारी कर्मचार्‍यांना दररोज त्यांची जागा व ड्युटी ठरवून देतात. असे असतानाही पोलीस निरीक्षक सुरक्षा व्यवस्थेबाबत हस्तक्षेप करून दर्शन व्यवस्था व सुरक्षा कर्मचार्‍यांच्या ड्युटीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतात.

या सर्व गोष्टींमुळे देवस्थानच्या व्यवस्थापनाला मानसिक त्रास होत आहे. 15 फेब्रुवारी रोजी सरन्यायाधीश शरद बोबडे शनिदर्शनासाठी आले असता पोलीस निरीक्षकांनी देवस्थानच्या विश्वस्तांना जनसंपर्क कार्यालयात थांबण्यास मज्जाव केला व उर्मट भाषेचा वापर केला. हे अधिकारी नेहमीच मनमानी कारभार करून अरेरावीची भाषा वापरतात तसेच विश्वस्त, कर्मचारी, व्यवस्थापन यांचेबरोबर असभ्य वर्तन करून पदाचा गैरवापर करतात. तरी सदर अधिकार्‍याविरुद्ध चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी. निवेदनावर ए. सी. शेटे, शालिनी राजू लांडे, योगेश बानकर, आप्पासाहेब ज्ञानदेव शेटे, दीपक दरंदले, भागवत सोपान बानकर या विश्वस्तांची नावे व सह्या आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com