पोलिसांच्या त्रासामुळे शिंगणापुरात अन्य जिल्ह्यांतील भाविकांची संख्या रोडावली

पोलिसांच्या त्रासामुळे शिंगणापुरात अन्य जिल्ह्यांतील भाविकांची संख्या रोडावली

बेकायदा क्रुझरद्वारे प्रवासी वाहतुकीला वाहतूक पोलिसांचे मिळते अभय

सोनई (वार्ताहर)- शनी दर्शनासाठी येणारे शनिभक्त व भाविक शनिशिंगणापूर येथील पोलीस ठाण्याचे वाहतूक शाखेचे पोलीस व त्यांच्या बगलबच्यांना अक्षरशः वैतागलेले असल्याने परप्रांतीय व इतर जिल्ह्यांतील भाविकांच्या वाहनांची संख्या अतिशय कमी पडत चालली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मात्र शिर्डी येथून हॉटेल्स व भक्तनिवासासमोरून राजरोसपणे एक एका क्रुझर जीपमध्ये 20 ते22 स्त्री-पुरुष भाविक व लहान मुलांना भरून आणून लोकांच्या जीवाशी अक्षरशः खेळ खेळला जात असल्याचे शिर्डी-शिंगणापूर मार्गावर दिसून येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी शिर्डी ते शनिशिंगणापूर मार्गावर दररोज 100 ते 200 जीपमधून बेकायदा प्रवासी वाहतूक केली जाते.त्यात क्रुझर व मॅक्स कंपनीच्या जास्त प्रवासी बसू शकणार्‍या जिप गाड्यांचा मोठा समावेश आहे. शनिवार व अन्य काही विशेष मुहूर्तांना भाविकांची संख्या वाढत असल्याने त्या बेकायदा प्रवासी वाहतूक जीपची संख्याही वाढते.

शिंगणापूर येथील खाजगी वाहनतळावरच्या ठराविक दुकानांतच ह्या जीप थांबवल्या जातात व तेथेच पूजासाहित्य पान फूल,तेल,नारळ,नाल, प्रसादाचे ताट आलेल्या भाविकांना दिले जाते व दर्शन करून आल्यानंतर पैसे द्या असे पूजासाहित्य विक्री दुकानदार व कर्मचारी सांगत असतात. त्यामुळे श्रद्धेने आलेले भाविक दुकानदारावर विश्वास ठेवून पूजा ताट घेऊन शनिदर्शनासाठी जातात.

ते जेव्हा परत येतात तेव्हा पूजासाहित्य विक्रेता खाजगी वाहनतळावरचा दुकानदार व कामगार गिर्‍हाईकाचे राहणीमान पाहून मनमानेल ती किंमत मागतात. खाजगी वाहन तळावरील दुकानांना शॉप अ‍ॅक्टप्रमाणे शासनाकडे नोंदही नसल्याचे समजले परंतु हे ‘धनाढ्य’ दुकानदार केवळ धतींग वर आपले व्यवसाय चालवीत असून प्रशासनाकडून त्यांचेवर अद्यापर्यंत धडक कारवाई ऐकिवात नाही.

पोलिसांची मनमानी व अभद्र युती
भाविक घेऊन आलेल्या जीप शिंगणापूर ग्रामपंचायतच्या टोलनाक्यावरून शनि मंदिराकडे जात असतात नियमित येणार्‍या क्रुझर, मेक व मॅजिक वाहनांचा मोठा समावेश असतो टोलनाक्यापासून पाचशे फुटावर असलेल्या एका झाडाजवळ वाहतूक पोलीस व त्याचा एक पंटर थांबलेला असतो या गाड्यांना ते कधीही अडवीत नाहीत अगर कागदपत्रे, प्रवासी यांची चौकशीही करीत नाहीत कारण ह्या बेकायदा प्रवासी वाहतूक क्रुझर, मॅजिक व मॅक्स गाड्या ह्या शिंगणापूर खाजगी वाहनतळावरील पूजासाहित्य विक्रेत्यांनी खरेदी केलेल्या असून त्यांच्याबाबतचे सर्व सोपस्कार मंथली हे गाळेधारक वाहतूक पोलिसांना नियमितपणे पोहोच करीत असतात. मात्र दुसरे आश्चर्य असे की शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात वाहतूक पोलीस अगर त्याच्या सोबत असलेला पंटर किंवा झीरो पोलीस हे इतर जिल्ह्यांतून आलेल्या वाहनांना झाडाजवळ थांबवतात दंड भरण्याचा दम देत पांढरा पोशाख परिधान केलेला वाहतूक पोलीस व त्याचा साथीदार झिरो पोलीस बाहेरच्या भाविक वाहनचालकाकडून किंवा मालकाकडून मनमानी दंड वसूल करतात काही वेळा दंडाची शासकीय पावती दिली जातेही परंतु बहुतांश वेळा तडजोड करून रोख रक्कमही घेतली जात असल्याचे हे वाहन धारक सांगतात.

वादग्रस्त अधिकारी
सध्या शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात नेमणूक असणारे पोलीस निरीक्षक हे लवकरच सेवानिवृत्त होणार असल्याची माहिती मिळत असून गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या वादग्रस्त कामकाजाबाबत देवस्थान, विश्वस्त, सुरक्षा विभाग व ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. तक्रारी वाढल्या आणि एका वर्षात तीन ठिकाणी बदल्या झाल्या होत्या असेही पोलीस वर्तुळातून समजले.

क्रुझरमध्ये जीवघेणी वाहतूक-
शनी शिंगणापूर मधील पूजासाहित्य विक्रेते खाजगी वाहन तळातील या महाभागांनी आता लटकू कमी झाल्याने एका वाहनातून 20 ते 22 प्रवासी आणू शकणारे क्रुझर, मॅक्स व मॅजिक गाड्या खरेदी करून ह्या गाड्या आपापल्या गाळ्यावर आणून उभे करण्याची यंत्रणा उभी केल्याने गिर्‍हाईक सावज समजून आपाल्या गाळ्यात आणण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू असून या वाहनांना शिंगणापूर पोलिसांचे अभय असल्याने चालका शेजारी चार प्रवासी त्यामागचे सीटवर मागेपुढे 8 प्रवासी व मागच्या डिक्कीमध्ये व्यवस्था केल्याने 8 प्रवासी असे 20 ते 22 बेकायदा प्रवासी वाहतूक शिंगणापूर पोलिसांच्या आशीर्वादाने चालू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com