Wednesday, April 24, 2024
Homeनगरशेलार यांचा सरकारी कार्यालयांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

शेलार यांचा सरकारी कार्यालयांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

प्रमुख अधिकारी गायब : खुर्चीला हार घालून केली गांधीगिरी

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार यांनी काल श्रीगोंदा शहरातील प्रमुख सरकारी कार्यालयांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे कार्यालयातील भोंगळ कारभार उघड झाला. सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमि अभिलेख व तहसील कार्यालयात फक्त शिपाई, क्लर्क असे मोजकेच कर्मचारी उपस्थित होते. अखेर सत्ताधारी पक्षाचे असलेले शेलार यांना अधिकार्‍यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी करण्याची वेळ आली.

- Advertisement -

सोमवार श्रीगोंद्याचा आठवडे बाजाराचा दिवस. तालुक्यातील विविध भागांतून कामानिमित्त शेतकरी, विद्यार्थी व इतर लोक सरकारी कार्यालयात या दिवशी येतात. सरकारी अधिकारी कार्यालयात हजर नसल्याच्या तक्रारी शेलार यांच्याकडे आल्यावर त्यांनी खातरजमा करण्यासाठी युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष अख्तर शेख, काँग्रेसचे प्रसाद काटे व इतर प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत सार्वजनिक बांधकाम कार्यालयाला भेट दिली. तेथे एक शिपाई व लेखनिक हजर होते. उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, कार्यालय अधीक्षक व इतर कर्मचारी गायब होते. कार्यालयाबाहेर कामानिमित्त आलेल्यांची गर्दी होती. नंतर तहसील कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवला. तेथेही अशीच अवस्था होती. शिपाई, क्लर्क हजर व तहसीलदारांसह अन्य अधिकारी व कर्मचारी कार्यालयात नव्हते.

कामानिमित्त आलेले लोक साहेबांची वाट पाहत होते. शेलार यांचे पथक नंतर भूमी अभिलेख कार्यालयात पोहचले. तेथे शिपाई व मोजके एकदोन कर्मचारी हजर होते. उपअधीक्षक व अन्य कर्मचारी जागेवर नव्हते. कामासाठी वारंवार हेलपाटे मारणारे त्रस्त नागरिक कार्यालयाबाहेर होते. फोन केल्यानंतर साहेब आऊट ऑफ कव्हरेज होते.

संतप्त शेलार यांनी तिन्ही कार्यालयांच्या वरिष्ठांना फोन करून कैफियत मांडली. तालुक्याच्या अधिकार्‍यांना विनाकाम पगार घेण्याचा व अनुपस्थित राहून हजर असल्याचे दाखविण्याचा परवाना कोणी दिला, असा प्रश्न उपस्थित करून याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून संबंधितांवर कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. मोहिते यांनी झाल्या प्रकाराची दखल घेणार असल्याचे सांगितले.

भूमी अभिलेखमध्ये गांधीगिरी
जनतेच्या सर्वाधिक तक्रारी भूमी अभिलेख कार्यालयाबाबत होत्या. वरील तिन्ही ठिकाणी भेट दिल्याचा प्रसंग फेसबुकवर लाइव्ह होता. नेटिझन्सनी त्यावर प्रतिसाद दिला. भूमी अभिलेख उपअधीक्षकांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या