Saturday, April 27, 2024
Homeनगर…म्हणून जगतापांचे मंत्रीपद हुकले !

…म्हणून जगतापांचे मंत्रीपद हुकले !

शरद पवारांची नगरमध्ये ‘मन की बात’

अहमदनगर (प्रतिनिधी) – मंत्रिपदाची संधी देताना मी नगरचा वेगळ्या पद्धतीने विचार केला. संपूर्ण जिल्ह्यात एकमेव राहुरी असे होते, की तेथे मंत्रिपदाची संधी मिळालेली नव्हती. राहुरीच रिकामे दिसल्याने तेथे संधी देण्यात आली, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

एम.आय आसीर यांच्या रुपाने नगर शहराला एकदा मंत्रीपद मिळाले होते, त्यामुळेच विद्यमान आमदार संग्राम जगताप यांची लाल दिव्याची संधी हुकली अशी दुसरी बाजू त्यामागे असल्याचे पवार यांच्या बोलण्यातून अधोरेखित झाले.

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर खातेवाटपास विलंब होतोय, असे मला वाटत नाही. तसेच मंत्रीपद न मिळाल्यामुळे आमच्या पक्षात कोणतीही नाराजी नाही, असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ नेते रामनाथ वाघ यांच्या अंत्यदर्शनासाठी पवार येथे आले होते. त्यानंतर हेलिपॅडवर ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, नगरला मंत्रीपद देताना मी प्रत्येक मतदारसंघाचा विचार केला. त्यामध्ये अकोलेला अनेकदा मिळाले होते, राहाता, श्रीगोंदे येथेही कोणालातरी मंत्रिपद होते.

तीच परिस्थितीत कोपरगावचीही होती. नगर शहरालाही पूर्वी संधी मिळालेली आहे. या सर्वांमध्ये राहुरीच एकमेव मला रिकामे दिसले. त्यामुळे तेथे देऊन टाकले. एवढेच नव्हे, तर या निमित्ताने तरूणाला संधी दिल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मंत्रीपद न मिळाल्याने आमच्या पक्षात अजिबात नाराजी नाही. उलट आमच्याकडे नको म्हणणारे आहेत. गृहमंत्रीपद कोणी घ्यावे, यासाठी मी विचारणा केल्यानंतर एक दोघांनी मला नको म्हणून सांगितले. त्यामुळे नाराजी असणे शक्यच नाही. मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर दोन-चार दिवसांनी खातेवाटप होत असते. एका पक्षाचे सरकार असताना हे होते, येथे तर तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे विलंब झाला, असे मला वाटत नाही. आज किंवा उद्या खातेवाटप जाहीर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

देशातही प्रयोग?
राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग देशभरात करण्याबाबत आतातरी हालचाली नाहीत. मात्र लोकांना आता पर्याय हवा आहे. हा पर्याय कोणताही एक पक्ष देऊ शकत नाही. त्यासाठी समान कार्यक्रम निश्चित करून एकत्र यावे लागेल. यावर नक्कीच चर्चा केली जाईल. झारखंड येथील मुख्यमंत्र्यांनी ‘आम्ही महाराष्ट्राचा आदर्श घेतला’ असे म्हटल्याचे मी वाचले आहे. त्यामुळे असे आणखी कोणाकोणाला वाटते ते पाहून मग ठरवता येईल, असे पवार म्हणाले.

दोनदा मिळाली संधी
एम.आय. आसीर हे नगरचे आमदार असताना त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली होती. वसंतदादा पाटील यांच्या मंत्रीमंडळात ते परिवहन मंत्री होते. त्यानंतर युती सरकारच्या कार्यकाळात अनिल राठोड यांनीही काही काळासाठी मंत्रीपद मिळाले होते. शरद पवार यांनी हा सगळा अभ्यास केल्यानंतर नगरला एकदा संधी मिळाली आहे. राहुरीला मात्र कधीच संधी मिळालेली नाही असा विचार केल्यानेच आ. संग्राम जगताप यांचे मंत्रीपद हुकले अशी चर्चा नंतर सुरू झाली. विशेष म्हणजे खुद्द पवार यांनीच ही ‘मन की बात’ नगरात आज बोलून दाखविली.

- Advertisment -

ताज्या बातम्या