रामनाथ वाघ कृतिशील विचारांनी जगले-  शरद पवार
Featured

रामनाथ वाघ कृतिशील विचारांनी जगले- शरद पवार

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – रामनाथ वाघ यांचे संपूर्ण आयुष्य हे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी भरलेले होते. ते कृतिशील जीवन जगले. आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत त्यांनी समाजसेवेचे व्रत घेतले म्हणून त्यांच्या स्मृती अनंत काळ चिरंतर राहतील असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी केले.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त रामनाथ वाघ यांचे बुधवारी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर गुरूवारी दुपारी नगर येथील अमरधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यदर्शनासाठी जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या लालटाकी येथील कार्यालयात त्यांचा पार्थिव आणण्यात आला होता.

यावेळी अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी खा. पवार हे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अ‍ॅड. रामनाथ वाघ यांनी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात एक नंबरचे काम केले. अ‍ॅड. वाघ यांचा अमृतमहोत्सवी सत्कार एक तारखेला झाला. त्यांचे निधनही एक तारखेला झाले. त्यांनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि विशेष करून शैक्षणिक क्षेत्रात मोठे एक नंबरचे काम केले.

यांचे कार्य चौफेर होते. गेली 60 वर्ष सक्रिय राजकारणात राहून त्यांनी समाजहीत जोपासले. ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून अखंड कार्य केले. जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या उभारणीत त्यांचा मौलिक वाटा होता. त्यांच्या जाण्याने मी कृतीशील विचारांचा सहकारी गमावला असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com