शनैश्वर देवस्थान विश्वस्तांच्या तक्रारीची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली दखल
Featured

शनैश्वर देवस्थान विश्वस्तांच्या तक्रारीची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली दखल

Sarvmat Digital

शनीशिंगणापूर (वार्ताहर)- श्रीक्षेत्र शनीशिंगणापूर येथील शनीजयंती उत्सव साजरा करताना जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग झाल्याबाबत काही विश्वस्तांनी केलेल्या तक्रारीच्या वृत्ताची जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दखल घेतली असून या प्रकरणी सखोल चौकशी करून पुढील कारवाई करण्याचे आश्वासन विश्वस्त शालिनी लांडे यांना भ्रमणध्वनीद्वारे दिले असून आता पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

याबाबत माहिती की, शनिजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर पोलीस प्रशासनाकडून घाईघाईने शनिजयंती दिवशी 11 वाजता पत्र देऊन करोना संसर्गजन्य रोग पसरू नये म्हणून पाच लोकांच्या आत धार्मिक विधी परंपरेनुसार साजरा करावा, असे लेखी पत्र देवस्थान प्रशासनला देण्यात आले होते. त्यात पत्राच्या आदेशानुसार कलम 144 नुसार जो कोणी कायद्याचे, नियमाचे उल्लंघन करेल त्याच्यावर गुन्हे दाखल होतील असे नमूद करण्यात आले होते.

परंतु खुद्द देवस्थान मंदिर परिसरात 25/30 नागरिकांनी गर्दी करून सोशल डिस्टन्स न पाळता कलम 144 चा भंग केल्या प्रकरणाची चौकशी करून संबंधित उपस्थित असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी देवस्थानचे उपाध्यक्ष नानासाहेब बानकर, विश्वस्त डॉ. रावसाहेब बानकर, व शालिनीताई लांडे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी केली होती.

देवस्थानचा कारभार पाहण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या अधिग्रहण कायद्याच्या चौकटीत राहून लवकरात लवकर कायद्याची अंमलबजावणी करून देवस्थान ट्रस्टला एक कर्तव्यदक्ष उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी द्यावा, असा सूर अनेकांनी व्यक्त केला.

शनिजयंती निमित्ताने रेड झोन औरंगाबाद जिल्ह्यातील भद्रा मारुती देवस्थानचे सुरक्षा अधिकारी आरतीला उपस्थित होते. त्यांना कोणी आणले? ते शनिशिंगणापूरला आले कसे? करोनासारखा रोग पसरला तर जबाबदार कोण? त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करावा.
– शालिनीताई लांडे विश्वस्त

Deshdoot
www.deshdoot.com