दमदाटीच्या विरोधात माध्यमिक शिक्षक सोसायटीसमोर निदर्शने
Featured

दमदाटीच्या विरोधात माध्यमिक शिक्षक सोसायटीसमोर निदर्शने

Sarvmat Digital

सत्ताधारी ज्येष्ठ संचालकाच्या बंधूने माजी चेअरमनला धमकाविल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी) – माध्यमिक शिक्षक सोसायटीत पुन्हा सत्तेवर आलेल्या मंडळाच्या ज्येष्ठ संचालकाच्या बंधूने सोसायटीचे माजी चेअरमन सुनील काकडे यांना शिवीगाळ करून धमकाविल्याच्या निषेधार्थ परिवर्तन मंडळाच्यावतीने विरोधी संचालकांनी सोसायटीच्या प्रवेशद्वारात निदर्शने केली.

या आंदोलनात विरोधी संचालक बाबासाहेब बोडखे, अप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, अंबादास राजळे, दिलीप बोठे, ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाष कडलग, भाऊसाहेब जिवडे, मारुती लांडगे, नंदकुमार शितोळे, सुनील दानवे आदी सहभागी झाले होते.

माध्यमिक शिक्षक सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. निकालाच्या दिवशी सोसायटीचे ज्येष्ठ संचालक असलेले जबाबदार व्यक्तीच्या भावाने सुनील काकडे यांना शिवीगाळ करीत धमकावले. याचा निषेध म्हणून माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमन पदाच्या निवडीच्या पहिल्या सभेच्या दिवशी निदर्शने करण्यात आली.

शिवीगाळ करुन धमकावणे ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी असून, ही दादागिरी खपवून घेणार नसल्याचे अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले. बाबासाहेब बोडखे यांनीही तीव्र शब्दात निषेध नोंदवला.

Deshdoot
www.deshdoot.com