माध्यमिक सोसायटीसाठी आज मतदान
Featured

माध्यमिक सोसायटीसाठी आज मतदान

Sarvmat Digital

पुरोगामी-परिवर्तन मंडळाची प्रतिष्ठा पणाला, निवडणुकीसाठी 250 कर्मचारी तैनात

अहमदनगर (वार्ताहर)- जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची कामधेनु असणार्‍या जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळासाठी रविवारी मतदान होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी पुरोगामी मंडळाविरोधात परिवर्तन मंडळ निवडणूक रिंगणात असून मतदानानंतर लगच सोमवारी मतमोजणी होणार आहे.

सुमारे 10 हजार 203 मतदार असलेल्या जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या 21 जागांसाठी 340 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यातून अर्ज छाननी प्रक्रियेत 17 अर्ज बाद झाले. तर अर्ज माघारी घेण्याच्या मुदती नंतर प्रत्यक्षात 64 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हाभर शिक्षक नेत्यांच्या सभा, मेळाव्यातून आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडल्याने माध्यमिक शिक्षकांमधील राजकारण चांगलेच तापले होते.

यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे. पारदर्शी कारभार केल्याचा सत्ताधारी आघाडीने दावा केला असून सोसायटीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी आघाडीने केला आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजता प्रचाराचा धुराळा थांबला. रविवारी होणार्‍या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाने कंबर कसली असून जिल्ह्यातील 30 मतदान केंद्रासाठी मतदानाचे सर्व साहित्य शनिवारी दुपारी रवाना करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी 250 कर्मचारी तैनात करण्यात आले असून मतदानाची वेळ सकाळी 8 ते 4 अशी ठेवण्यात आली आहे. सोमवारी ओम गार्डन मंगल कार्यालय येथे मतमोजणी होणार असून निवडणूक निर्णायक अधिकारी म्हणून तालुका उपनिबंधक के. आर. रत्नाळे हे काम पहात आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com