शाळा सुरू करण्यासाठी व्यवस्थापन समित्यांचा अभिप्राय ठरणार महत्वाचा
Featured

शाळा सुरू करण्यासाठी व्यवस्थापन समित्यांचा अभिप्राय ठरणार महत्वाचा

Sarvmat Digital

पूर्वतयारी म्हणून जिल्हा परिषदेने सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांकडून मागविली माहिती

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा कधी सुरू कराव्यात याच्या पूर्व तयारीचा भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाने जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकडूनच माहिती मागवली आहे. यात संबंधीत शाळेची शालेय व्यवस्थापन समिती शाळा सुरू करण्यास तयार आहे का? यासंदर्भात व्यवस्थापन समितीची बैठक झाली आहे? यासह संबंधीत शाळेतील शिक्षक आणि संबंधीत शाळा असणार्‍या गावात डीएड्- बीएड् स्वयंसेवक शिक्षक उपलब्ध आहेत ? या माहितीचा यात समावेश आहे.

यामुळे जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यापूर्वी शालेय व्यवस्थापन समितीचा अभिप्राय महत्वाचा ठरणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांच्या संयुक्त सहीने काढलेल्या पत्रात जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकडून करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 15 जूनपासून शाळा सुरू करण्यासाठी माहिती मागविली आहे. ही माहिती मागवितांना जिल्हा परिषदेने अप्पर सचिव यांच्या व्हिडीओ कॅन्फरंस बैठकीचा संदर्भ दिला आहे.

जिल्ह्यात करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 2020-21 मध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नयेत, यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. शाळा सुरू करण्याच्या पूर्व तयारीचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांकडून माहिती मागविण्यात आली आहे. यात शाळेचे नाव, यु-डायस कोड, गाव, तालुका, संबंधीत शाळेत करोना क्वारंटाईन सेंटर होते?, असल्यास त्याचा कालावधी, शाळा असणार्‍या गावातील करोनाची स्थिती, संबंधित गावात डिएड्, बीएड् स्वयंसेवक शिक्षक उपस्थित होवू शकतील ?, शाळा सुरू करण्यासाठी संबंधीत शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची बैठक झाली का? झाली नसल्यास कधी नियोजित आहे?, शाळा व्यवस्थापन समितीच्या चर्चेनुसार शाळा कधी सुरू करता येईल याबाबत स्पष्टपणे विचारणा करण्यात आली आहे.

यासह शाळेत प्रत्यक्षात येवू शिक्षण घेेणारी आणि ऑनलाईन पध्दतीने शिक्षण घेवू इच्छा असणार्‍या विद्यार्थ्यांचा तपशील मागविण्यात आला आहे. यात प्रत्यक्षात शाळेत येण्यास तयार असणारे विद्यार्थी, ऑनलाईन शिक्षण घेण्यास तयार असणारे विद्यार्थी यात देखील टि.व्हीव्दारे, रोडिओ आणि स्मार्टफोनव्दारे शिक्षण घेण्यास इच्छुक असणार्‍या विद्यार्थ्यांच्या माहितीचा यात समावेश आहे. दरम्यानही सर्व माहिती जिल्हा परिषद पातळीवर पुढील आठवड्यात संकलित होणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांनी सांगितले.

तपशीलवार माहिती मागवली
शाळांकडून येणार्‍या माहितीमध्ये जिल्हास्तरावर दोन्ही शिक्षण विभाग पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते दहावी आणि अकरावी आणि बारावी या विद्यार्थ्यांंची पट संख्या, शाळा असणार्‍या गावातील शिक्षकांची संख्या, शाळा असणार्‍या गावात दुसर्‍या गावाहून येणार्‍या शिक्षकांची संख्या, तसेच संबंधीत शिक्षक ज्या गावातून शाळेत अध्यापनासाठी येतात त्या गावातील मागील काळातील करोनाचे रुग्ण होते की नाही, असल्यास त्यांची संख्या, यासह संबंधीत गावातील शाळेत पहिली ते बारावीपर्यंत शाळेत उपलब्ध होवू शकणारे बीएड् आणि डिएड् स्वयंसेवक शिक्षक यासह 15 जूनपासून कशा प्रकारे शाळा सुरू करता येईल, या तपशीलाचा समावेश आहे.

व्यवस्थापन समिती समोर चार पर्याय
करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीला चार पर्यायात शाळा सुरू करता येईल? याबाबत विचारणा करण्यात आली आहे. यात प्रत्यक्षात नियमितपणे, प्रत्यक्षात मात्र दोन सत्रात, प्रत्यक्षात मात्र कमी वर्ग संख्याने (आळी-पाळीने) आणि पूर्णपणे ऑनलाईन शाळा चालविणे याचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com