Friday, April 26, 2024
Homeनगरशाळांमध्ये महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण नाही

शाळांमध्ये महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण नाही

संगमनेर (वार्ताहर) – यावर्षी देशभरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. भारतातही त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवरती भारत सरकारने 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे 1 मे ला महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण होणार किंवा नाही याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत होती. अखेर शाळांमध्ये ध्वजारोहण करण्यात येणार नसल्याची माहिती हाती आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जिल्हास्तरावरती ध्वजारोहण करण्यासंदर्भात आदेश दिले होते. मात्र राज्यात सुमारे 1 लाख शाळा असून या शाळांमध्ये दरवर्षीच 1 मे ला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात येत असते. त्यामुळे यावर्षी गेले एक महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरती ध्वजारोहण करायचे किंवा कसे यासंदर्भात शाळांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते ही बाब लक्षात घेऊन काही जिल्हा परिषदांनी मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सहकारी एखादा शिक्षक यांनी ध्वजारोहण करावे असे आदेश दिले होते.

- Advertisement -

सदरचे आदेशही रद्द करण्यात आले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशाचे पालन करण्याचे सूचित केले आहे. जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकारी, पालकमंत्री, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत केवळ ध्वजारोहण करण्यात यावे. त्या शिवाय जिल्ह्यात इतरत्र ध्वजारोहण करण्यात येऊ नयेत असे आदेश असल्यामुळे शाळांमध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशाचे पालन करून शाळा स्तरावर ध्वजारोहण न करण्याबाबत सूचित केले असल्याचे समजते. त्यामुळे यावर्षी 1 मे महाराष्ट्र दिन विद्यार्थी व शिक्षकांना घरी राहूनच साजरा करावा लागणार आहे.

महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम नाही
दरवर्षी 1 मे ला महाराष्ट्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यानिमित्ताने विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढणे, घोषणा देणे, शाळेच्या आवारा बरोबर माध्यमिक विद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, ग्रामपंचायत व इतर शासकीय कार्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात येत असते. त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे होत असतात. याच दिवशी जागतिक कामगार दिन असतो. त्यानिमित्तानेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. मात्र यावर्षी संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर करण्यात आला असून अनेक ठिकाणी संचार बंदीचे आदेश देण्यात आल्यामुळे पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्रित येता येणार नाहीत. त्यामुळे यावर्षी कोणत्याही स्वरूपाचे कार्यक्रम होणार नसल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या