शिष्यवृत्ती : उत्तरपत्रिकेची मिळणार कार्बन कॉपी
Featured

शिष्यवृत्ती : उत्तरपत्रिकेची मिळणार कार्बन कॉपी

Sarvmat Digital

संगमनेर (वार्ताहर)- महाराष्ट्रातील इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेण्यात येणार्‍या शिष्यवृत्ती परीक्षेच्या उत्तर पत्रिकेची कार्बन कॉफी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहे. यामुळे परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी मदत होणार आहे.

महाराष्ट्रातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. यावर्षी रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या परीक्षेच्या नियोजनात यावर्षी महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकांची संख्या कमी पडल्यावर होणारी धावपळ व त्यामुळे होणारी बदनामी लक्षात घेऊन परीक्षा परिषदेने केंद्रावरील एकूण विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन नऊ टक्के प्रश्नपत्रिका अधिक पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. तर तालुका स्तरावर देखील अतिरिक्त प्रश्नपत्रिका संच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी परीक्षा पूर्ण होताच विद्यार्थ्यांच्या हाती पडणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या गुणांचा अंदाज घेता येणार आहे. त्यातून शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या दृष्टीने परीक्षेत पारदर्शकता आणण्याचा हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या निर्णयाचे शिक्षणक्षेत्रातून स्वागत होत आहेत.

परीक्षा परिषदेची बदनामी टळणार
राज्यात दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा संपल्यानंतर प्रश्नपत्रिका संच कमी पडले, माध्यम बदलून आले, झेरॉक्स काढायला वेळ लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळ वाढवून द्यावा लागला. या स्वरूपाचे प्रकार सातत्याने पुढे येत होते. यातून परीक्षेबद्दलची पालकांची विश्वासार्हता कमी होत चालली होती. ही बाब लक्षात घेऊन परीक्षा परिषदेने अतिरिक्त प्रश्नपत्रिका पुरविण्याचा घेतलेला निर्णय हा परीक्षा परिषदेची बदनामी टाळणारा ठरेल असे शिक्षण क्षेत्रातून बोलले जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com