Wednesday, April 24, 2024
Homeनगरपतसंस्था चळवळ संकटाला तोंड देण्यास समर्थ !

पतसंस्था चळवळ संकटाला तोंड देण्यास समर्थ !

वाबळे, काळे, कपाळे यांचा विश्वास : संकटावर मात करू

अहमदनगर (प्रतिनिधी) – करोनामुळे जगावर आर्थिक संकट कोसळले आहे. देशाच्या सकल उत्पादन घसरण्यासोबत अनेकांवर नोकर्‍या गमावण्याची वेळ आली आहे. मात्र भारतीय या कठीण स्थितीवर मात करतील, असा विश्वास व्यक्त करत नगर जिल्ह्यातील पतसंस्था चळवळ या संकटाला तोंड देण्यास समर्थ असून पुढील 6 महिन्यात परिस्थिती रूळावर येईल, असा विश्वास या क्षेत्रातील जाणकार मान्यवरांनी व्यक्त केला.

- Advertisement -

‘सहकार, संकट आणि संधी’ या विषयावर ‘सार्वमत संवाद कट्टा’ या ऑनलाईन चर्चासत्रात फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष तथा प्रेरणा पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे, संत नागेबाबा मल्टीस्टेटचे अध्यक्ष कडूभाऊ काळे आणि साई आदर्श मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवाजी कपाळे यांनी या सहभाग नोंदविला. हे भारतीयांवर आलेले पहिले संकट नाही. यापूर्वीही अनेक संकटे आली. यावेळी त्याचे रूप मोठे आहे. मात्र आपण त्यावर निश्चित मात करू. जिल्ह्यातील पतसंस्थांची स्थिती उत्तम आहे.

आपल्यावर पैसा लावून ठेवण्याची चांगली सवय आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात व्यवहार थंडावले असले तरी ठेवींमध्ये किंचीत वाढ दिसून आली. हे सकारात्मक आहे. आपल्याकडे कृषी अर्थव्यवस्था मजबूत आहे. त्यामुळे नगर जिल्हा लवकरच या आर्थिक संकटावर मात करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाचकांसाठी संपूर्ण चर्चा सार्वमतच्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे.

जिल्ह्यातील शेतकरी अनेकदा अडचणींवर मात करण्यात यशस्वी झाला आहे. यावेळीही नव्या दमाने जिल्हा उभा राहील. आगामी काळात कृषी क्षेत्राला मोठी संधी आहे. त्याचा परिणाम जिल्ह्याचे अर्थकारण सुधारण्यावर होईल. त्यामुळे काही काळानंतर स्थिती सुरळीत होईल.
– शिवाजी कपाळे, अध्यक्ष, साई आदर्श मल्टीस्टेट.

पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून सातत्याने संवाद साधून आर्थिक कामकाज अधिक सुरळीत ठेवण्याचे काम झाले. नवे तंत्रज्ञान स्वीकारलेले आहे. त्यामुळे आगामी काळात अधिक जलद सेवा देवून जिल्ह्याची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी पतसंस्था निश्चितच आपली भुमिका बजावतील.
– सुरेश वाबळे, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट.

नोटाबंदीमुळे संकटांशी आधीच सामना झाला होता. त्यातूनही आर्थिक संस्था सावरल्या होत्या. त्यामुळे कामकाज आणि आधुनिक तंत्रातील बदलांनी लॉकडाऊनच्या काळात मदतच केली. सामान्य माणसाला पुन्हा आपल्या पायावर उभे राहण्यासाठी पतसंस्था नक्कीच मदतीचा हात पुढे करतील.
– कडूभाऊ काळे, अध्यक्ष, नागेबाबा मल्टीस्टेट.

- Advertisment -

ताज्या बातम्या