Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरकाळ अडचणीचा, धोरणात्मक मात हवी

काळ अडचणीचा, धोरणात्मक मात हवी

‘सार्वमत संवाद कट्टा’ : ऑनलाईन चर्चासत्रात उद्योजकांचे मत

अहमदनगर (प्रतिनिधी) –  करोना संकटामुळे उद्योग जगत अडचणीत आहे. यातून लवकर बाहेर पडावे लागेल, अन्यथा मोठे आरिष्ट्य कोसळेल. सरकारने तातडीने मदतीचे धोरण जाहीर केले पाहिजे. सवलती आणि पॅकेज जाहीर केले पाहिजे, तरच या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग प्रशस्त होईल, असे मत नगर येथील उद्योजकांनी नोंदवले.

- Advertisement -

‘सार्वमत संवाद कट्टा’ या ऑनलाईन चर्चासत्रात ‘उद्योगकोंडी’ या विषयावर इपीटोम कंपोनंट्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर अनुराग धूत, आमीचे अध्यक्ष तथा आर.एस.इंजिनिअरिंगचे सीईओ राजेंद्र कटारिया, टेक्नोट्रॅक इंजिनियरिंगचे सीईओ तथा आनंद एज्युकेशनचे अध्यक्ष अशोक सोनवणे यांच्याशी सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी संवाद साधला. यावेळी उद्योग, जागतिक स्थिती त्याचा नगरसारख्या एमआयडीसीवर होणारे परिणाम, सरकारी नियम व मदत अशा विषयांवर या मान्यवरांनी मुद्दे मांडले.

उद्योगासाठी शतकातील सर्वात वाईट अवस्था निर्माण झाली आहे. भारताने उद्योग धोरणातच आमूलाग्र बदल केला पाहिजे. आगामी काळात नगर जिल्ह्यातील युवा उद्योजकांना दूरदृष्टी दाखवून पावले टाकावी, असे मत श्री.धूत यांनी मांडले. श्री.कटारिया म्हणाले, सध्या नगरसारख्या उद्योगनगरीला कामगारांचा तुटवडा भेडसावत आहे. सध्या भीतीमुळे कामगार स्थलांतर वेगात आहे.

याचा परिणाम होणार आहे. तर श्री.सोनवणे यांनी आता उद्योजक आणि कामगार यांच्यात समन्वय अधिक वाढविण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी उत्तर प्रदेश सरकारने बदललेल्या कामगार कायद्याकडे लक्ष वेधले. सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगासाठी सरकारने पॅकेज जाहीर केले तर संकटातून सावरण्यासाठी आधार मिळेल, असे त्यांनी सांगितले.

उद्योग वाचविण्यासाठी सरकारला सकारात्मक हस्तक्षेप करावाच लागेल. लवकर याबाबत निर्णय होतील, अशी अपेक्षा आहे.
– अनुराग धूत

जिल्ह्यातील तरुण खासदार व आमदारांकडून उद्योगवाढीच्या प्रयत्नांची अपेक्षा आहे. हे नेते यासाठी पुढाकार घेतील असे वाटते.
-राजेंद्र कटारिया

सध्या उद्योग सुरू झालेले असले तरी त्यात उत्पादन काही नाही. मेंटेनन्स वर्क असेच त्याचे स्वरूप आहे. ही परिस्थिती नक्कीच बदलेल.
– अशोक सोनवणे

आपण ही संपूर्ण चर्चा ‘सार्वमत’च्या फेसबुक पेजवर पाहू शकता त्यासाठी खलील लिंक क्लिक करा…..

- Advertisment -

ताज्या बातम्या