सराफ दागिने लूट प्रकरणी सोनईत गुन्हा दाखल

सराफ दागिने लूट प्रकरणी सोनईत गुन्हा दाखल
  • उपलब्ध पावत्याप्रमाणे दागिने लुटल्याची फिर्यादीत नोंद
  • 20 तोळे सोने व पाऊण किलो चांदीच्या पावत्या

नेवासा (का. प्रतिनिधी)- नेवासा-राहुरी तालुक्याच्या सिमेवर असलेल्या राहुरी तालुक्यातील मांजरी येथे सराफ दुकान असलेल्या सराफ व्यावसायिकाचा त्याच्या नेवासा तालुक्यातील खेडलेपरमानंद या गावी मंगळवारी सायंकाळी घरी परतत असताना चोरट्यांनी डोळ्यात मिरचीपूड टाकून लाखो रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने लुटल्या प्रकरणी काल सोनई पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत निखील बाळासाहेब आंबिलवादे (वय 21) धंदा-सराफ दुकान रा. खेडलेपरमानंद ता. नेवासा यांनी काल दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, मांजरी येथील त्यांचे ‘गुरुकृपा ज्वेलर्स’ हे दुकान सायंकाळी बंद करून 200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 760 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असे 7 लाख 90 हजार 778 रुपये किंमतीचे दागिने चेनीच्या बॅगमध्ये भरुन त्यांच्याकडील स्कूटरवरून खेडलेपरमानंद येथे घरी परतत असताना पानेगाव ते खेडलेपरमानंद रस्त्यावर पानेगाव शिवारात सायंकाळी साडेसहा वाजता काळ्या रंगाच्या युनिकॉर्न गाडीवरील चालक व त्याच्याबरोबरील अन्य तीन अनोळखी चोरटे यांनी त्यांना रस्त्यात थांबण्यास सांगितले व पत्ता विचारण्याचा बहाणा केला.

त्यांच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून फिर्यादीच्या पाठिवरील सोन्या चांदीच्या दागिन्यांची बॅग ओढून जबरीने चोरुन घेवून गेले. त्यानंतर बाळासाहेब आंबिलवादे यांनी जखमी अवस्थेत मांजरी येथील ओम मल्टीस्पेशालिटी दवाखान्यात उपचार घेतले व बुधवार दि. 22 रोजी रात्री पावणेआठ वाजता सोनई पोलीस ठाण्यात येवून फिर्याद दाखल केली.

सोनई पोलिसांनी फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर फर्स्ट 23/2020 भारतीय दंड विधान कलम 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे करत आहेत.

चोरट्यांनी लुटलेले दागिने

सोने (200 ग्रॅम- 7 लाख 60 हजार रुपये)- पावत्याप्रमाणे एकूण 200 ग्रॅम वजनाच्या दागिन्यांमध्ये सोन्याचे 3 नेकलेस, कानातील (इअरींग) जोड, कुडके पुडी, टॉपजोड, रिपेरिंगचे गंठण, लहान गंठण, डिस्को बाळ्यांची पुडी, फॅन्सी गोल रिंगांची पुडी, सटुबाई व बाळ्यांची पुडी, लहान बाळांच्या अंगठ्या, ठुशी, गोल व खरबुजे आकाराचे मिक्स मणी, डोरले, रेग्युलर जेन्टस्, लेडीज अंगठ्या, लेडीस पेन्डल्स इत्यादी. या सर्व दागिन्यांवर इंग्रजीत डीबीए असे शिक्के आहेत. सन 2019 मधील खरेदी पावत्याप्रमाणे प्रति ग्रॅम प्रमाणे सोन्याची किंमत असलेले.

चांदी ( 760 ग्रॅम- 30 हजार 778 रुपये) – पायातील जोडवी, कडे, वाळे, चांदीच्या सरी, बाहुटी, तोरडी (पैंजण), चांदीचे गणपती, लक्ष्मी, सरस्वतीच्या लहान मुर्त्या, चांदीच्या जोडव्याचे मध्यभागी आतील बाजूस इंग्रजीतून डीबीए असा छाप व पैंजणावर इंग्रजीतून डीजी-1 असा छाप असलेले दागिने

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com