श्रीरामपूरच्या ‘त्या’ दोन सराफांना अटक
Featured

श्रीरामपूरच्या ‘त्या’ दोन सराफांना अटक

Sarvmat Digital

जिल्हा बँकेतील सोने तारण घोटाळा प्रकरण

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या दोन शाखांमध्ये झालेल्या सोने तारण घोटाळा प्रकरणातील फरार असलेले गोल्ड व्हॅल्युअर राजन माळवे व अशोक माळवे हे स्वतःहून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांना अटक करुन त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी दिली आहे.

श्रीरामपूर शहर शाखेचे गोल्ड व्हॅल्युअर राजन कचरू माळवे व शिवाजी रोड शाखेचे गोल्ड व्हॅल्युअर अशोक कचरू माळवे यांच्यावर बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून नागरिकांच्या नावे सुमारे 34 लाख 59 हजार रुपयांचे कर्ज काढले असा आरोप आहे. याबाबत शाखाधिकारी विलास कसबे यांनी फिर्याद दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

या दोन शाखांमध्ये 22 लोकांना सोने तारण कर्ज दिले होते. मात्र कर्ज थकल्याने बँकेने जप्ती कारवाई केली. या सोन्याचा लिलाव केला असता ते बनावट असल्याचे लक्षात आले. त्यामुळे कर्जदार व गोल्ड व्हॅल्युअर यांच्याविरोधात संगनमत करून कर्ज काढल्याचा ठपका ठेवीत गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र या घोटाळ्याशी आमचा संबंध नाही अशी याचिका कजरदारांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे. तसेच सहकार खात्याच्या नाशिक येथील सहनिबंधक कार्यालयाकडे तक्रार नोंदविलेली आहे. या घोटाळ्यातील दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्याने बरेच सत्य बाहेर येणार आहे. मात्र अद्यापही इतर काही आरोपी फरार आहेत. या गुन्ह्यात काही सावकारही पोलिसांच्या रडारवर आहेत.

सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी केला घोटाळा
बँकेचे गोल्ड व्हॅल्युअर राजन माळवे व अशोक माळवे हे दोन आरोपी शहरचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्यापुढे हजर झाले. त्यांनी आम्ही काही खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. महिन्याला सुमारे 10 ते 12 टक्के व्याजाने त्यांना एक कोटीचे व्याजही दिले आहे. या सावकारांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आम्ही हा घोटाळा केल्याचे आरोपींनी सांगितले. त्यामुळे आता हा कोटीभर व्याज घेणारा सावकार कोण? याचा तपास पोलीस करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com