Thursday, April 25, 2024
Homeनगरसॅनिटायझरचा ट्रकच चार अज्ञात चोरट्यांनी पळविला

सॅनिटायझरचा ट्रकच चार अज्ञात चोरट्यांनी पळविला

ट्रक ड्रायव्हर व क्लिनरला शिवीगाळ करुन मारहाण; अवघ्या काही तासांमध्ये कर्जत पोलिसांनी मालट्रकसह 21 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला

कर्जत (वार्ताहर) – नगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील पाटेवाडी शिवारात अंकलेश्वर गुजरात येथून त्रिवेंद्रम केरळ या ठिकाणी सॅनिटायझर घेऊन जात असलेला ट्रक चार अज्ञात चोरट्यांनी चालकास मारहाण करून पळवून नेला; परंतु अवघ्या काही तासांमध्ये कर्जत पोलिसांनी मालट्रक आणि त्यामधील 21 लाख रुपये किमतीचे सॅनिटायझर हा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की नगर-सोलापूर या महामार्गावर कर्जत तालुक्यातील पाटेवाडी शिवारात एका ठिकाणी धोकादायक वळण व चढ असलेला रस्ता आहे. याठिकाणी सर्वच वाहने मोठ्या सावकाशीने चालवली जातात. याच ठिकाणी दिनांक 10 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास सॅनिटायझरने भरलेला ट्रक क्रमांक टी. एन. 28 बी. ए. 1694 हा गुजरात राज्यातील अंकलेश्वर या शहरांमधून केरळ राज्यातील त्रिवेंद्रमकडे जात होता.

त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर अज्ञात दोन चोरटे आले व त्यांनी ट्रकला दुचाकी आडवी लावली. त्याच वेळी पाठीमागून टाटा एसी ही गाडी आली. या गाडीमधून दोघे जण खाली उतरले आणि या चौघा चोरट्यांनी ट्रक ड्रायव्हर व क्लिनर यांना शिवीगाळ मारहाण करीत गाडीच्या खाली ओढले आणि त्यांच्या ताब्यातील मालट्रक क्रमांक टी. एन. 28 बी. ए. 1694 हा सोलापूरच्या दिशेने पळवून नेला. ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना समजताच त्यांनी तात्काळ पोलीस पथक त्याठिकाणी पाठवले.

याप्रमाणे रस्त्यावर असणार्‍या चेक पोस्टवर याबाबत सूचना दिल्या हा ट्रक करमाळा तालुक्यातील जातेगाव येथे पोहोचल्यावर पोलीस आल्याची चाहूल लागली असता चोरट्यांनी ट्रकमधून उड्या टाकून पोबारा केला. या नंतर पोलिसांनी मालट्रक ताब्यात घेतला असून कर्जत येथे पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. मोरे हे करीत आहेत. याप्रकरणी ट्रकचालक मनिवेल पेरुमाल राहणार मुच्चाहपट्टी तामिळनाडू याने कर्जत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चार चोरट्यांवर भादवि कलम 394/34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या