Wednesday, April 24, 2024
Homeनगरसंगमनेरातील तळीरामांचे मोफत जेवणाचे डबे बंद

संगमनेरातील तळीरामांचे मोफत जेवणाचे डबे बंद

स्वयंसेवी संस्थांचा दणका; मद्य खरेदी पडली महागात

संगमनेर (शहर प्रतिनिधी)- दारूचे दुकान उघडल्यानंतर दारू खरेदीसाठी लाईनमध्ये उभे राहणार्‍या अनेक गरीब तळीरामांना मद्यखरेदी चांगलीच महागात पडली आहे. गरीब म्हणून ज्यांना मोफत जेवणाचे डबे दिले जातात तेच गरीब शेकडो रुपये खर्च करून मद्य खरेदी करताना आढळल्याने संतापलेल्या स्वयंसेवी संस्थांनी या तळीरामांचे जेवणाचे डबे त्वरीत बंद करण्याचा निर्णय घेतला. तब्बल 100 जण आजपासून मोफत डब्यांना मुकणार आहेत.

- Advertisement -

शहरात करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. संचारबंदीच्या काळात अनेकांची गैरसोय झाली. शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना अंंमलात आणल्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व इतर स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाला साथ देत नागरिकांना मदत कार्य सुरू केले.

शहरातील गरजू नागरिकांना दररोज 800 मोफत जेवणाचे डबे पुरविण्याचे काम या स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केले. यामुळे अनेकांची जेवणाची गैरसोय दूर झाली. अनेक दिवस नागरिक या डब्यांचा आनंद घेत आहेत. आपण गोरगरिबांची सेवा करत असल्याचा आनंद विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते घेत असताना, काल त्यांच्या आनंदावर विरजण पडले. आपण चुकीच्या लोकांची सेवा करत असल्याचे जाणवल्याने पश्चाताप करण्याची वेळ त्यांच्यावर आली.

जिल्हाधिकार्‍यांनी देशी व विदेशी दारू सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर काल सकाळी शहरातील विविध दारूची दुकाने सुरू झाली. दारू खरेदी करण्यासाठी मोठी रांग दिसत होती. काही स्वयंसेवकांनी या रांगेचे व्हिडिओ चित्रीकरण केले. या रांगेत दारू खरेदी करण्यासाठी विविध ठिकाणचे नागरिक दिसत होते. गोरगरीब म्हणून ज्यांना जेवणाचे डबे दिले जायचे असे 100 नागरिकही दिसले. यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी या नागरिकांचे जेवणाचे डबे बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करत जेवणाचे डबे बंद करण्यात आले. जेवणासाठी पैसे नसणार्‍यांंकडे दारूसाठी पैसे असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

तळीरामांच्या सरकारी सवलती काढून घ्या
मद्य खरेदीसाठी सर्वत्र वाईन शॉपसमोर मोठ्या प्रमाणात वाईन शौकिंनानी गर्दी केली. दारू खरेदीसाठी या मंडळींकडे पैसा आहे. त्यामुळे या मंडळींना मिळणार्‍या रेशन,मोफत वैद्यकीय सुविधा व अन्य सरकारी सवलती काढून घेण्यात याव्यात, अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.

मद्यपींची दलाली अंगलट आली
दारू खरेदी करण्यासाठी रांगेत अनेक जण होते. स्वतःला उच्चभ्रू समजणार्‍यांनी या रांगेत उभे न राहता काही गरिबांना 100 ते 200 रुपये देऊन दारुसाठी रांगेत उभे केले. मद्यपींची दलाली करणार्‍या या नागरिकांचेही डबे बंद करण्यात आले. श्रीमंत साथीदारासाठी खरेदी करणे या खर्‍या गरिबांना महागात पडले आहे. लॉकडाऊनमध्ये दारू खरेदी करणार्‍या व मोफत जेवणाचे डबे घेणार्‍यांबद्दल बजरंग दलाचे जिल्हा सह संयोजक कुलदीप ठाकूर यांनी संताप व्यक्त केला. आम्ही शहरात 800 डबे देतो. यापैकी आजपासून 100 जणांना डबे देणे त्वरित बंद केले असून उर्वरीत नागरिकांचे डबेही बंद करणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या