संगमनेरचे परिचय संमेलन देश-विदेशांत नावाजलेले – अशोक बंग
Featured

संगमनेरचे परिचय संमेलन देश-विदेशांत नावाजलेले – अशोक बंग

Sarvmat Digital

संगमनेर (प्रतिनिधी) – राजस्थान युवक मंडळाच्या वतीने संगमनेर मध्ये आयोजित केले जाणारे संमेलन अतिशय उपयुक्त ठरत असल्याने या संमेलनाने आता देशाच्या सीमा ओलांडून विदेशांतही आपला ठसा उमटविला आहे. या निमित्ताने माहेश्वरी समाजातील विवाहयोग्य युवक युवतींना जीवनसाथी निवडण्यासाठी परिपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. हे संमेलन म्हणजे समाजाच्या हितासाठी केला जात असलेला महायज्ञ आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योगपती अखिल भारतीय माहेश्वरी महासभेच्या दक्षिणाचल विभागाचे उपसभापती अशोक बंग यांनी केले.

मालपाणी क्लब अँड रिसोर्टमध्ये आयोजित करण्यात आलेल्या नवव्या अखिल भारतीय माहेश्वरी विवाहयोग्य युवक युवती परिचय संमेलनाचे उद्घाटक या नात्याने श्री. बंग बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी, स्वागताध्यक्ष राजेश मालपाणी, कार्याध्यक्ष कैलास राठी, उपाध्यक्ष रोहित मणियार, सचिव महेश झंवर, कोषाध्यक्ष कल्याण कासट, प्रकल्प प्रमुख कैलास आसावा, प्रकल्प प्रमुख सुमित अट्टल आदी मान्यवर उपस्थित होते. देशाच्या विविध भागांतून आलेले माहेश्वरी युवक-युवती व त्यांचे पालक आणि समाजातील अनेक प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येने संमेलनास उपस्थित होती.

स्वतःच्या जोडीदाराविषयी मुलामुलींच्या अपेक्षा हल्ली खूप अवास्तव असतात. त्यामुळे विवाहाचे वय उलटून जाते. आई-वडिलांसह सर्वांनाच मानसिक ताणाचा सामना करावा लागतो. बहुतेक मुलींना मोठ्या शहरातील स्थळ हवे असते. एकमेकांचे व्यक्तीमत्त्व किती अनुरूप आहे हे न पाहाता पॅकेज किती आहे यावर जोर दिला जातो. त्यामुळे आजकाल वधू आणि वर यांचे विवाह होतात की एका पॅकेजचे दुसर्‍या पॅकेजशी लग्न होते, असा संभ्रम निर्माण झाला आहे. घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे.

मुलीच्या आईचा तिच्या संसारात नको एवढा हस्तक्षेप हल्ली होत आहे. त्यातून अनेक गंभीर समस्या उत्पन्न होतात. याचा सर्व मुलींच्या मातांनी विचार केलाच पाहिजे. राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी आणि त्यांना समर्पित भावनेने साथ देणारे 200 हून अधिक कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून आयोजित करीत असलेले संमेलन म्हणजे समाजाच्या हितासाठी केलेला महायज्ञ आहे. या यज्ञाची फलश्रुती खूप चांगली असेल याची मला खात्री आहे, असे श्री. बंग म्हणाले.

मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी विवाह जुळविण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. स्वागताध्यक्ष राजेश मालपाणी म्हणाले, औद्योगिकता हे आपल्या समाजाची गुणवैशिष्ट्ये असून त्यापासून दूर जाऊन चालणार नाही. माहेश्वरी समाज जगातील 40 हून अधिक देशांत विखुरलेला आहे. जेथे जातो तेथील समाज जीवनाशी साखरे प्रमाणे विरघळून एकरूप होणारा हा समाज आहे. मात्र समाजाची घटत चाललेली संख्या चिंतेचा विषय आहे. त्यावर विचार व्हायला हवा. समाजातील विवाह जुळविण्यासाठी राजस्थान युवक मंडळ सातत्याने करीत असलेल्या प्रयत्नांना समाजाकडून मिळत असलेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे, असे ते म्हणाले.

विवाहयोग्य युवक-युवतींची समग्र माहिती असलेल्या परिचय पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अनेक वर्षे समर्पित भावनेने कार्य करणार्‍या सरला आसावा, राध्येश्याम राठी, भगवानदास पलोड, श्रीकांत कासट, अतुल झंवर इत्यादी पाच कार्यकर्त्यांचा सन्मान श्री. बंग यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व तुळशीचे रोप असलेली कुंडी देऊन करण्यात आला. त्यांच्या कार्याच्या माहितीचे वाचन सम्राट भंडारी व कल्याण कासट यांनी केले. अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष अनीष मणियार व महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे जनसंपर्क मंत्री मनीष मणियार यांचा निवडीबद्दल श्री. बंग यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविकात कार्याध्यक्ष कैलास राठी यांनी मंडळाच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित मणियार व निशांत जाजू यांनी केले. अतिथींचा परिचय महेश पडतानी व आशिष राठी यांनी करून दिला. आभार रोहित मणियार यांनी मानले.

Deshdoot
www.deshdoot.com