संगमनेर, राहाता तालुक्यांतील पाच पाणलोट अतिशोषित
Featured

संगमनेर, राहाता तालुक्यांतील पाच पाणलोट अतिशोषित

Sarvmat Digital

93 गावांतील भूजल पातळी वाढविण्यासाठी अटल भूजल योजनेतून मिळणार निधी

अहमदनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्रासह पाणीटंचाई असणार्‍या सहा राज्यांतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी केंद सरकारने जागतिक बँकेसोबत अटल भूजल योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत राज्यातील नगरसह 13 जिल्ह्यांचा समावेश असून नगर जिल्ह्यात संगमनेर आणि राहाता तालुक्यातील पाच पाणलोट अतिशोषित असून त्या ठिकाणी भूजल पातळी वाढविण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण विभागाने दिली.

देशात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये पाणीटंचाई असणार्‍या भागात अटल भूजल योजना सुरू करण्यात येणार आहे. ही योजना केंद्र सरकार आणि जागतिक बँकेच्या भागीदारीतून राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, अमरावती, नाशिक आणि नागपूर जिल्ह्यांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. या ठिकाणी खालावलेली भूजल पातळी वर आणण्यासाठी 925 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

साधारणपणे अतिशोषित, शोषित आणि अंशत: शोषित अशा तीन प्रकारांत पाणलोटांचे वर्गीकरण करून भूजल व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या योजनेत मनरेगा (रोजगार हमी), प्रधानमंत्री कृषी सिंचन, एकात्मीक क्षेत्र विकास, सुक्ष्म सिंचन या सर्व योजना एकत्रित करून उपाय योजना राबविण्यात येणार आहेत. यात भूजल सर्वेक्षण विभाग नोडल संस्था म्हणून कार्यरत राहणार आहे.

अतिशोषित, शोषित आणि अंशत: शोषित भागातील पाणलोटामध्ये भूजल व्यवस्थापन संस्था स्थापन करण्यात येणार आहेत. राज्यातील 13 जिल्ह्यांत 50 अतिशोषित, दोन शोषित आणि 33 अंशत: शोषित पाणलोट क्षेत्र आहेत. या पाणलोटामधील एक हजार 380 गावांत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात संगमनेर आणि राहाता तालुक्यांत पाच अतिशोषित पाणलोट असून जिल्ह्यातील 93 गावांत अटल भूजल योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी भू वैज्ञानिक प्रकाश बेडसे यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com