संगमनेर नायब तहसीलदारप्रकरणी एकवटल्या महसूल संघटना

संगमनेर नायब तहसीलदारप्रकरणी एकवटल्या महसूल संघटना

गुन्हा मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन : अन्यथा 15 तारखेपासून असहकार आंदोलनाचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- संगमनेरच्या नायब तहसीलदारांनी आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी घेतली असतानाही त्यांच्यावर साथ रोग प्रतिबंधात्मक कायद्य ावये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हा त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 तारखेपर्यंत दाखल गुन्हा मागे न घेतल्यास असहकार आंदोलन करण्याचा इशारा राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना पाठविलेल्या निवेदनात दिला आहे. संगमनेरचे नायब तहसीलदार मूळचे पुणे जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांचे पूर्ण कुटुंबीय पुण्याला राहते. ते सध्या संगमनेर तहसील कार्यालयात करोना योद्धा म्हणून करोनासंबंधित सर्व कामे करण्यासाठी कार्यरत होते. त्यांना मधुमेह व इतर व्याधी असतानाही त्यांनी करोनाच्या संकटात कर्तव्याला प्राधान्य दिले.

आतापर्यंत संगमनेर अनेकदा हॉटस्पॉट झाले, अशा कठिण काळातही इतर अधिकार्‍यांसह त्यांनी चोख कामगिरी बजावली. दरम्यान, कुटुंबीयांना भेटण्यासाठी विश्रांतवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथे जाण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी 28 मे रोजी अर्जाव्दारे संगमनेर तहसीलदारांकडे केली होती. त्यासाठी त्यांनी संगमनेर ग्रामीण रूग्णालयातून आरोग्य प्रमाणपत्रही अर्जासोबत जोडले होते. या अर्जावर नायब तहसीलदार कदम यांच्यासह त्यांचा कारचालक व इतर एक असे तिघे प्रवास करणार होते. दि. 28 मे ते 1 जून असा प्रवासाचा कालावधी होता. त्यावर संगमनेर तहसीलदारांनी हा अर्ज मंजूर करत कदम यांना प्रवासाची रितसर परवानगी दिलेली होती.

दरम्यान, कदम पुणे येथे जाऊन पुन्हा संगमनेरला आले. परंतु त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटल्यामुळे त्यांनी पुन्हा पुणे गाठले. त्यानंतर त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळला. दरम्यान, त्यांच्या पासचा कालावधी शिल्लक असताना ते पुण्याला गेले की नंतर गेले, याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात 31 मे ते 6 जून या दरम्यान त्यांनी प्रवास केल्याचा उल्लेख आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर महसूल संघटना आता आक्रमक होऊन एकवटल्या आहेत. गुन्हा दाखल करण्याचे आदेश देणार्‍या जिल्हाधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी तहसीलदार संघटनेने केली आहे. 15 तारखेपर्यंत गुन्हा मागे न घेतल्यास असहकार आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

तर अन्य कर्मचार्‍यांचे मनोबल घसरेल
सदर नायब तहसीलदार हे अनियंत्रित मधुमेही रुग्ण असतानाही ते चोवीस तास कार्यालयात राहून योगदान देत होते. त्यांच्यावर आधीचे उपचार पुणे येथे झालेले आहेत. प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने पुणे येथे जावे लागले. दरम्यान करोना योद्ध्यांना जिल्हा बंदीतून शिथिलता देण्याबाबत आरोग्य विभागाने परिपत्रक काढलेले आहे. असे असतानाही करोना योद्ध्यांवर व तेही आजारी असताना गुन्हे दाखल होत असतील तर इतर कार्यरत कर्मचार्‍यांचेही मनोबल घसरणार असल्याचा दावा राजपत्रीत अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केला आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com