Thursday, April 25, 2024
Homeनगरसंगमनेरात आजपासून तीन दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन‘

संगमनेरात आजपासून तीन दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन‘

संगमनेर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूने देशात धुमाकूळ घातला असतांना संगमनेरात 15 जण संशयीत म्हणून ताब्यात घेतलेल्यांपैकी चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संगमनेरात घबराट पसरली आहे. तर प्रशासनाने आजपासून तीन दिवस संगमनेरात कडकडीत बंद पाळण्याचे आदेश काढले आहे. ज्या परिसरातून 15 जणांना ताब्यात घेण्यात आले होते तेथील संपर्कात आलेल्या नागरिकांची कालपासून तपासणी सुरु करण्यात आली आहे.

जामखेडमध्ये आढळून आलेल्या दोन परदेशी नागरिकांच्या संपर्कात आल्याच्या कारणावरुन संगमनेरातील 15 जणांना प्रशासनाने तीन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. या सर्वांची जिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्यांचे स्त्राव तपासणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. या नमुन्यांचा अहवाल काल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. यामध्ये संगमनेरच्या 15 पैकी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

- Advertisement -

संगमनेरच्या सापडलेल्या बाधित व्यक्तींच्या संपर्कात आणखी कोण कोण लोक आलेत, याचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे.
शहरातील नायकवाडपुरा, बागवानपुरा, रहेमतनगर, मोगलपुरा हा परिसर प्रशासनाने यापूर्वीच सील केला आहे. काल आलेल्या 15 जणांच्या अहवालात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा प्रशासनाने सतर्क होत संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी सुरु केली आहे.

यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसिलदार अमोल निकम, डीवायएसपी रोशन पंडीत, पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी सदर ठिकाणची पाहणी केली. संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी तेथील एका खासगी हॉस्पीटलमध्ये करण्यात येत आहे. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया, डॉ. भवर हे लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, या संगमनेर खुर्द येथील प्रवरा नदीवरील मोठ्या पुलावरुन वाहतूक बंद करण्यात येणार आहे. नायकवाडपुरा, बागवानपुरा, रहेमतनगर, मोगलपुरा या परिसरात कुणी जाणार नाही, तेथील एकही व्यक्ती बाहेर येणार नाही, असा प्रतिबंध प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. मोठ्या पुलावरुन अत्यावश्यक सेवेची येणारी वाहने ही बायपास मार्गे वळविण्यात येणार नाही, जेणेकरुन या भागातून वाहने येणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे.

संगमनेर येथून पाठविण्यात आलेल्या संशयित व्यक्तींपैकी चार व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहे. त्यामुळे इतर नागरिकांना देखील संसर्ग होण्याची शक्यता अनेक पटीने वाढलेली आहे. तरी सर्व जबाबदार नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, दि. 3 एप्रिल ते 5 एप्रिल 2020 हे तीन दिवस आपण उस्फूर्तपणे 100 टक्के संचारबंदीचे पालन करावे. तीन दिवसाच्या कालावधी मध्ये अत्यावश्यक सुविधा सर्व नागरिकांना घरपोच देण्यासंदर्भात संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. शासनाने आधीच संचारबंदी लागू केलेली असल्याने संचार बंदीचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता कलम 188 तसेच साथरोग कायदा अंतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच दि. 14 एप्रिल पर्यंत संचारबंदी कायम राहणार असल्याने या कालावधीत विनाकारण कोणीही फिरताना आढळून आल्यास त्याचे वाहन जप्त करण्यात येईल, याची नोंद नागरिकांनी घ्यावी आणि प्रशासन व भावी पिढीच्या भल्यासाठी सहकार्य करावे, आजपासून तीन दिवस कोणीही घराच्या बाहेर आढळून आल्यास त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 188 तसेच साथ रोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल.
– डॉ. शशिकांत मंगरुळे, प्रांताधिकारी, संगमनेर
– श्री. अमोल निकम, तहसिलदार, संगमनेर

- Advertisment -

ताज्या बातम्या