संगमनेर जिल्हा व्हावा ! ; सतीश भांगरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Featured

संगमनेर जिल्हा व्हावा ! ; सतीश भांगरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Sarvmat Digital

अकोले (प्रतिनिधी) – अकोले तालुक्याचा विकास होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संगमनेर जिल्हा निर्मितीला अग्रक्रम द्यावा अशी मागणी शिवसेनेचे युवा नेते सतीश भांगरे व त्यांच्या सहकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

अलीकडच्या दोन दशकांमध्ये निर्माण झालेल्या जिल्ह्यांच्या तुलनेत केवळ अकोले आणि संगमनेर या दोन तालुक्यांचे भौगोलिक क्षेत्रफळ त्यांच्यापेक्षा अधिक असून तुलनात्मक आढावा घेतल्यास आदिवासी अकोले तालुक्याला संगमनेर जिल्हा निर्मितीमुळे न्याय मिळेल असा श्री. भांगरे यांचा दावा आहे.

अकोले व संगमनेर या दोन तालुक्यांत म्हणून 362 गावे येतात तर अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव या सहा तालुक्यांचा मिळून विचार केला तर या सर्व व भागांमध्ये 691 गावांचा अंतर्भाव होतो आणि या सर्व तालुक्यांची 2001 च्या जनगणनेनुसार 18 लाख 27 हजार 654 लोकसंख्या होते याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

केवळ अकोले तालुक्याचा विचार केला तर अकोले तालुक्यात 191 गावांचा अंतर्भाव आहे आणि 2001 सालच्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या 2 लाख 71 हजार 719 इतकी असून तालुक्याचे क्षेत्रफळ एक लाख 95 हजार 500 हेक्टर इतके आहे आणि 191 गावांचा यात अंतर्भाव होतो.

आदिवासी बहूल असणार्‍या तालुक्यांमध्ये गेले 75 वर्षे आदिवासींच्या मूलभूत सुविधा अभावामुळे मिनी काश्मिर म्हणून अकोले तालुका विकसित होऊ शकला नाही व जो काही विकासाचा भाग तिथपर्यंत पोहोचला तो कपात होत निकृष्ट दर्जाचा राहिला असल्याचा टोला त्यांनी राज्यकर्त्यांना लगावला आहे.

यासाठी संगमनेर जिल्हा निर्मिती झाल्यास तालुक्यातील एमआयडीसीचा प्रकल्प मार्गी लागण्याला अनुकूल वातावरण तयार होईल. शेतमालाची जिल्हा बाजारपेठ, जवळील रोजगाराच्या संधी पर्यटनाच्या व अन्य माध्यमातून मिळू शकतील आणि आदिवासी मुख्य प्रवाहात येण्यासाठी ही नामी संधी राहील. संगमनेर जिल्हा झाला तर नगरला जाऊन येऊन 301 किलोमीटरचे अंतर व रतनवाडी कुमशेत येथील आदिवासींचे हेलपाटे वाचणार आहे.

त्याऐवजी जाऊन येऊन सव्वाशे ते दीडशे किलोमीटर अंतर ते एका दिवसात पूर्ण करू शकणार आहेत. आज मात्र जिल्हा मुख्यालयासाठी दोन दिवस वाया जातात. वेळ, पैसा, श्रम यांचा विचार करता जिल्हा निर्मिती होणे गरजेचे आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही त्यांनी निवेदन पाठवून आपल्या भावना कळवल्या आहेत. या निवेदनावर आदिवासी कृती समितीचे स्वप्निल वायाळ, मंगेश पिसोड, बाळासाहेब वाजे, महेश धिंदळे, निलेश भांगरे, विलास सारुरक्ते, सागर डगळे, श्रावण भांगरे, विराज वायाळ, संदीप लांडे, हिरामण भांगरे, सखाराम भांगरे आदींच्या सह्या आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com