Wednesday, April 24, 2024
Homeनगरधांदरफळ बुद्रुक गाव प्रतिबंधात्मक म्हणून घोषित

धांदरफळ बुद्रुक गाव प्रतिबंधात्मक म्हणून घोषित

24 तास पोलिसांचा पहारा, संपूर्ण गावाची होणार आरोग्य तपासणी

संगमनेर (प्रतिनिधी)- संगमनेर तालुक्यातील पहिला करोनाबळी ठरल्याने संगमनेर पुन्हा हिटलिस्टवर आले आहे. धांदरफळ बुद्रुक येथील 67 वर्षीय इसम करोनाबाधीत होऊन मयत झाल्याने तेथील गावठाण परिसर सिल करण्यात आला आहे. त्याचबरोबर धांदरफळ बुद्रुक हे गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. गावठाण क्षेत्रासह संपूर्ण गावातील रहिवाशांची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार तथा इन्सीडेंट कमांडर अमोल निकम यांनी दिली.

- Advertisement -

गुरुवारी तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील 67 वर्षीय इसमाचा करोनाबाधीत म्हणून मृत्यु झाला. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली. या घटनेने प्रशासनाची झोप उडालीच. मात्र सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही झोप उडाली. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून साथ रोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये तहसीलदारांनी संगमनेर तालुक्यातील मौजे धांदरफळ बुद्रुक हे गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले. सदर क्षेत्रातील सर्व अस्थापना, अत्यावश्यक सेवा, वस्तुविक्री इत्यादी दिनांक 7 मे 2020 रात्री 12 वाजेपासून ते 20 मे 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पारीत केले आहेत. सदर क्षेत्रात नागरिकांचे आगमन व प्रस्थान तसेच या क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करण्यात आले आहे.

धांदरफळ बुद्रुक गाव व गावठाण परिसरात सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी करण्याकरीता वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये संनियंत्रण अधिकारी राजेंद्र कासार, वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकर, सहाय्यक सहनियंत्रण अधिकारी तथा ग्रामसेवक अशोक वर्पे यांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व परिस्थितीवर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय, वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर भवर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरीया, डॉ. यु. के. नंदकर हे लक्ष ठेवणार आहेत.

अत्यावश्यक सेवा वगळता या परिसरात येण्या-जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींनी घराबाहेर पडू नये. प्रतिबंधीत क्षेत्रात जाणार्‍या व्यक्तीची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच या क्षेत्रात जाणार्‍या-येणार्‍या व्यक्तींची दैनंदिन नोंद ठेवण्यात येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रात विशेष पथकाद्वारे आदेशापासून 14 दिवस घरोघरी सर्व्हेक्षण करून संशयित रुग्णांचा शोध घेण्यात येणार आहे. संशयितांचे तपासणी नमुने घेण्यात येतील. तसेच सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक व सामुदायीक कार्यक्रमांस बंदी घालण्यात आली आहे.

जीवनावश्यक वस्तू घरपोेहच देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याबाबत राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे कटाक्षाने पालन करावे. मशिद, मंदीर या सारख्या धार्मिक ठिकाणी प्रार्थनेसाठी एकत्र येऊ नये. नमाज पठण, इप्तार यासाठी एकत्रित येऊ नये. बाधीत रुग्णांच्या सानिध्यातील, संपर्कातील सर्व व्यक्तींचा शोध घेण्यात येणार आहे. दूध, किराणा, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू यांचे नियोजन संबंधीत सहाय्यक संनियंत्रण अधिकारी हे करणार आहेत.

प्रतिबंधीत क्षेत्रासाठी संगमनेर तालुका पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली 24 तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सदर प्रतिबंधीत क्षेत्रातील व्यक्ती यांना आपात्कालीन परिस्थितीत आत किंवा बाहेर जायचे असल्यास त्याचे अधिकार पोलीस निरीक्षक संगमनेर तालुका यांना देण्यात आले आहे. याप्रमाणे धांदरफळ बुद्रुक प्रतिबंधीत क्षेत्रात तहसीलदारांनी आदेश पारीत केले असून याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे सूचीत करण्यात आले आहे.

धांदरफळ बुद्रुक प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत येणारे क्षेत्र-
कासेश्वर मंदिर (कारमळा), डेरेवाडी गावठाण, देशमुख मळा, रामेश्वर वस्ती, विठ्ठल मंदिर, गावठाण, रानमळा, काटवन मळा,
रुग्ण असलेले ठिकाण-
विठ्ठल -रुक्मिणी मंदीर परिसर
प्रतिबंधात्मक क्षेत्र-
धांदरफळ बुद्रुक गावठाण परिसर:- हायस्कूलकडे जाण्याचा मार्ग, काळे गल्ली, धांदरफळ फाट्याकडे जाणारा मार्ग, वाणी गल्ली, इंदिरानगर गल्ली, मारुती गल्ली, मोहळे गल्ली, सुतार गल्ली, देवी गल्ली, कुंभारवाडा, कुंभारमळा, विठ्ठल -रुक्मिणी मंदिर, धांदरफळ खुर्दकडे जाण्याचा मार्ग.
एकूण घरे-323, एकूण लोकसंख्या-1629,
पथक- 1 सुपरवायझर, 1 आर. ओ., 10 आरोग्य कर्मचारी.
हायरीक्स-हायरीक्समधील रुग्ण जिल्हा रुग्णालयात
लोरीक्स – लोरीक्समधील रुग्णांच्या हातावर शिक्के मारुन होेम कोरंटाईन करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या