नेवासा तालुक्यातील ग्रामस्थांनी वाळूचा डंपर पकडून दिला तहसीलदारांच्या ताब्यात

file photo
file photo

पाचेगाव (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील पुनतगाव शिवारात काल रविवारी पहाटे वाळू भरून चालेला डंपर ग्रामस्थांनी पकडून तहसीलदारांच्या ताब्यात दिला असून वाळू तस्करांवर आज सोमवारी कारवाई होण्याची शक्यता आहे.

याबाबत माहिती अशी की, रविवारी पहाटे वाळू भरून जात असलेला डंपर पुनतगाव शिवारात ग्रामस्थांनी पकडून तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या ताब्यात दिला.रविवारी उशिरापर्यंत नेवासा पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव, निंभारी, पानेगाव आदी गावाच्या परिसरात वाळू चोरीने थैमान घातले आहे. राजरोस चालणार्‍या या अवैध धंद्यावर ना महसूलचे लक्ष आहे ना पोलीस प्रशासनाचे. ग्रामस्थांनी वाळू चोरीची वाहने पकडून दिली असता अनेकदा गुन्हे दाखल होत नाहीत.

एक-दीड महिन्यांपूर्वी पुनतगाव शिवारात एकापाठोपाठ वाळू तस्करांच्या दोन बोटी ग्रामस्थ आणि महसूलने उद्ध्वस्त केल्या होत्या. या अनुषंगाने काही प्रमाणात वाळू तस्करी रोखण्यात ग्रामस्थांना यश आले होते. परंतु वाळू तस्करांनी नदी पात्रातील पाणी कमी होताच पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी इमामपूर शिवारात देखील स्थानिक ग्रामस्थांनी वाळू तस्करी करण्यासाठी आलेले दोन डंपर पोलीस प्रशासनाकडे सुपूर्द केले होते. पण त्या दोन डंपरवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती असे समजले.

आपली संपत्ती समजून या भागातील ग्रामस्थ या वाळूची रखवाली करतात पण त्यांना दरवेळी यश येतेच असे नाही. कालच्या कारवाई दरम्यान तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या समवेत पुनतगाव सोसायटीचे अध्यक्ष नामदेव पवार, अरुण तागड, अशपाक देशमुख, नाना घोलप, रफीक शेख, साहेबराव पवार, विलास वाकचौरे, सुदर्शन वाकचौरे, साहेबराव लाडगे, लक्ष्मण पवार, शरद सुपेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

आज कारवाई होणार
वाळू चोरी करण्यात आलेला डंपर राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेत जमा केला असून सोमवारी वाळूची मोजदाद करून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वाळू चोरी करणारा डंपर लष्करे नामक व्यक्तीचा असल्याचे समजते. कारवाई करतेवेळी वाळू तस्करांपैकी एक जण जखमी झाला असून त्याच्यासह काहीजण फरार झाले.
– रुपेशकुमार सुराणा, तहसीलदार

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com