वाळूसाठ्यांच्या लिलावासाठी प्रशासनाची लगबग
Featured

वाळूसाठ्यांच्या लिलावासाठी प्रशासनाची लगबग

Sarvmat Digital

73 साठे प्राप्त : सर्वाधिक राहुरीतील मुळा आणि प्रवरा नदीत

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील नद्यांमधील 73 वाळूसाठ्यांचे लिलाव करण्यासाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली असून या भागात सर्व्हे करण्यात येणार आहे. नद्यांची पाणीपातळी कमी झाल्यामुळे हे सर्व्हेचे काम लवकरात लवकर हाती घेण्याचे नियोजन सुरू आहे.

यंदा जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर 2019 या काळात विक्रमी पावसाची नोंद झाली. चांगला पाऊस झाल्यामुळे नद्यांना पूर आला होता. त्यामुळे यंदा वाळूसाठा जास्त झाला आहे. त्यामुळे अवैध वाळूउपसा रोखण्याबरोबरच अधिकृत वाळू उपसा करण्यास परवानगी देण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. त्यासाठी त्यांना एकूण 73 जागांवरचे प्रस्तावही प्राप्त झाले आहेत.

यामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी व प्रवरा नदीमधील 25, राहुरीतील मुळा व प्रवरा नदीमधील 44, पारनेर तालुक्यातील एक व अकोले तालुक्यातील 3 प्रस्तावांचा समावेश आहे. याठिकाणी वाळूउपसा करण्यासाठी अधिकृत परवानगी देता येऊ शकते का, याची पाहणी करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

त्यासाठी लवकरच सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणच्या वाळू लिलावाच्या प्रक्रियेबाबतची पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com