साकुरी शिवारात ट्रकच्या धडकेत दोघे मोटारसायकलस्वार जागीच ठार
Featured

साकुरी शिवारात ट्रकच्या धडकेत दोघे मोटारसायकलस्वार जागीच ठार

Sarvmat Digital

नगर-मनमाड मार्गावरील घटना; एक तरुण कोपरगावचा तर दुसरा शिर्डीचा

शिर्डी (प्रतिनिधी)- नगर-मनमाड रोडवर साकुरी शिवेलगत असलेल्या केबीएस ग्रँड हॉटेलसमोरच काल गुरुवारी चार वाजेच्या सुमारास बाभळेश्वरकडून कोपरगावकडे जाणार्‍या अवजड मालवाहतूक करणार्‍या ट्रकने एका मोटारसायकलला पाठीमागून धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोघे जागीच ठार झाले. या अपघातात मयत झालेला एक कोपरगावचा तर दुसरा शिर्डी येथील राहणारा आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर-मनमाड रोडवर साकुरी शिवेलगत असलेल्या केबीएस ग्रँड हॉटेलसमोरच बाभळेश्वरकडून कोपरगावकडे जाणार्‍या ट्रकने (जेके 02 बीएन एएम 2968) सीडी डिलक्स मोटारसायकलला (एमएच 17 सीडी 6415) पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील तरुण अविनाश चांगदेव भगुरे (वय 24) रा. कोपरगाव व साई कचरू भंडागे (वय 23) राहणार श्रीरामनगर शिर्डी यांचा ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे व त्यांच्या पथकाने तात्काळ दोघांचे मृतदेह साईबाबा संस्थानच्या सुपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या दोघांनाही वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. त्यानंतर या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी राहाता येेथे नेण्यात आले.

मयत दोघे एकमेकांचे जीवलग मित्र होते. दोन्ही तरुणांच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे.दोन तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याने कोपरगाव व शिर्डी परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. नगर-मनमाड रोडवरून अवजड वाहनांना बंदी असताना अशी अवजड वाहने बाह्यवळण मार्गाने पिंपरी निर्मळ मार्गे सोडली पाहिजेत. तसेच निघोज चौकातून शिर्डी शहरात वाहने न सोडता शहरातून सोडली जात असतात.

हे अवजड वाहतुकीचे दोन्ही बळी असल्याचा सूर यावेळी शिर्डी ग्रामस्थांनी काढला आहे. याअगोदर सुध्दा शिर्डी शहरात या अवजड वाहतुकीमुळे काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. शिर्डी शहरातून अवजड वाहतूक राजरोसपणे का सुरू आहे? असा सवाल विचारला जात असून जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंग यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com