साकूरच्या वाळू तस्करांकडून देसवडेच्या मुळा नदीपात्रातून वाळूउपसा
Featured

साकूरच्या वाळू तस्करांकडून देसवडेच्या मुळा नदीपात्रातून वाळूउपसा

Sarvmat Digital

मातीमिश्रित परमिटच्या नावाखाली हजारो ब्रास वाळूउपसा

पारनेर (तालुका प्रतिनिधी) – संगमनेर तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या मातीमिश्रित वाळू परमिटच्या नावाखाली साकूर येथील वाळूतस्करांनी पारनेर तालुक्यातील देसवडे येथील वाडेकर वस्तीजवळ असणार्‍या पात्रात जेसीबी पोकलेनच्या साह्याने रात्रंदिवस प्रचंड वाळूउपसा सुरू केला आहे. त्यामुळे या अवैध वाळूउपसा करणार्‍या तस्करांवर महसूल विभागाने कारवाई करावी अशी मागणी देसवडेचे सरपंच बाबासाहेब भोर व ग्रामस्थांनी केली आहे.

तर दुसरीकडे यामुळे नदीपात्रात कोणत्याही प्रकारचा लिलाव अथवा परमिट नसतानाही जेसीबी, पोकलेनच्या साहाय्याने दिवसाढवळ्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याने महसूल व पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी पण देसवडे, वाडेकर वस्ती येथील ग्रामस्थांनी केली आहे.

संगमनेर तालुका हद्दीतील वाळूतस्करांनी साकूर येथील चौगुले नावाच्या शेतकर्‍याच्या खाजगी क्षेत्रात 600 ब्रास मातीमिश्रित वाळूची परवानगी संगमनेर महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून या ठिकाणी वाळू वाहतूक केली जात आहे; परंतु या वाळूतस्करांनी पारनेर तालका हद्दीतील असणार्‍या मुळा नदी पात्राकडे आपला मोर्चा वळविला असून देसवडे येथील वाडेकर वस्ती जवळील असणार्‍या नदीपात्रातून जेसीबी पोकलेनच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूउपसा केला जात आहे.

यासंबंधीचे पुरावे संगमनेर येथील महसूल विभागाला देऊनही कोणत्या प्रकारची कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे या मातीमिश्रित परमिट च्या नावाखाली येथील मुळा नदीपात्रातून हजारो ब्रास वाळूउपसा केला जात आहे. यामुळे महसूल विभागाला लाखो रुपयांचा चुना लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुळा नदी पात्रात पारनेर संगमनेर पारनेर राहुरी अशा दोन तालुक्यांची हद्द असून या हद्दीचा फायदा घेत वाळूतस्कर वाळूउपसा करत असल्याची माहिती पुढे आली आहे.

परमिटच्या नावाखाली वाळूतस्करांची दिशाभूल : सरपंच भोर
संगमनेर तालुक्यातील साकुरी येथील काही वाळू तस्करांनी चौगुले नावाच्या शेतकर्‍याच्या शेतातून मातीमिश्रित परमिटच्या नावाखाली अवैध वाळूउपसा गेल्या आठ दिवसापासून सुरू केला आहे. परंतु ज्या ठिकाणचे परमिट आहे त्या ठिकाणी वाळूउपसा न करता त्यांनी आपला मोर्चा पारनेर तालुक्याचा हद्दीत असणार्‍या मुळानदी पात्रातील वाडेकर वस्तीकडे वळविला आहे. त्यामुळे या ठिकाणी अवैध वाळूउपसा करणार्‍या तस्करांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सरपंच बाबासाहेब भोर यांनी दिला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com