Friday, April 26, 2024
Homeनगरसाईबाबा व टिळक भेटीची 103 वर्षे पूर्ण

साईबाबा व टिळक भेटीची 103 वर्षे पूर्ण

संगमनेर – थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि शिर्डीचे थोर संत साईबाबा यांच्या भेटीला आज 19 मे रोजी 103 वर्षे पूर्ण होत आहेत. या भेटीच्या वेळी सत्काराच्यावेळी उपयोगात आणलेली शाल संगमनेरकर अजूनही श्रध्देने जपत आहेत. दरवर्षी गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने श्रध्देने मिरवणूक काढत पूजा करत भावना जपत आहेत. यासंदर्भातील नोंदी साईभक्त दादासाहेब खापर्डे यांच्या दैनादिनीत दिसून येत आहेत.

स्वातंत्र्याची चळवळ मोठ्या वेगाने देशभर पसरत होती. लोकमान्यांचे नेतृत्व देशमान्य झाले होते. त्यातच दादासाहेब खापर्डे व लोकमान्य हे संगमनेर येथील संत वाड्यात थांबले होते. खापर्डे आपल्या डायरीत लिहितात की, सकाळी 8.30 वाजता वकील संत यांच्या घरी पानसुपारी झाल्यावर आम्ही निघालो. सकाळी दहावाजता शिर्डीत पोहचलो. तेथे निवासाची व्यवस्था दीक्षित वाड्यात करण्यात आली होती. त्यावेळी तिथे माधवराव देशपांडे, बापूसाहेब बुट्टी, नारायण पंडित, बाळासाहेब भाटे, बापूसाहेब जोग व इतर नोकर उपस्थित होते.

- Advertisement -

सर्वजण मशिदीत गेल्यानंतर तेथे साईबाबांना वंदन केले. बाबांना दक्षिणा दिली. सर्वांनी येवल्याला पुढील कामासाठी जाण्याची परवानगी मागितली. त्यावर बाबा म्हणाले, वाटेत उष्म्याने मरायला जावेसे वाटते का? इथे तुम्ही तुमचे जेवण करा. त्यानंतर वातावरणात गारवा वाटू लागल्यानंतर निघा. बाबांच्या आदेशानंतर माधवराव देशपांडे यांच्या घरी जेवण केले. विश्रांती घेऊन मशिदीत गेलो.

बाबा पहुडले होते. ते झोपले असे वाटले. लोकांनी लोकमान्यांना पानसुपारी दिली. मग परत मशिदीत गेलो. बाबांनी उदी दिली. निघण्याची अनुमती दिली. त्यानुसार पुढील प्रवास सुरू केल्याचे नमूद करण्यात आले. यावेळी बाबा आणि लोकमान्य यांच्या सत्कारात उपयोगात आणलेली शाल शामा यांच्याकडे देण्यात आली. ती शाल पुढच्या पिढीने संगमनेर येथील साईबाबा मंदिराकडे प्रदान केली. संगमनेर येथे इंगळेबाबा यांनी अत्यंत श्रध्देने तिची जपणूक केली आहे. दरवर्षी गुरूपौर्णिमेला तिची अत्यंत श्रध्देने पूजा करण्यात येते. दोन महान विभूतीच्या स्पर्शाने पावन झालेली वस्तू हा सर्वांच्याच श्रध्देचा विषय ठरला आहे.

लोकमान्यांना काय म्हणाले बाबा..
या भेटी दरम्यान लोकमान्य आणि साईबाबा यांच्यात संवाद झाला आहे. त्या संवादाचा काही भाग खापर्डे यांनी डायरीत नमूद केला आहे. या भेटीत साईबाबा लोकमान्यांना म्हणाले की, लोक वाईट आहे, तुम्ही तुम्हाला तुमच्यासारखे ठेवा. तर येवल्याला जाण्याची परवानगी मागितली असता ती न देता जेवण करून जाण्याची आज्ञा केली. तर खापर्डे हे बाबांच्या सहवासात अऩेक दिवस होते. ते लिहितात बाबा आज या भेटीच्या वेळी जितके प्रसन्न होते तितके प्रसन्न त्यांना यापूर्वी कधीच पाहिले नाही. ही प्रसन्नता म्हणजे दोन महापुरूषांच्या तेजाचे प्रतिबिंब होते जणू.

कोण होते खापर्डे
गणेश श्रीकृष्ण उर्फ दादासाहेब खापर्डे हे टिळकांचे स्नेही म्हणून परिचित होते. त्यांनी टिळकांना शिर्डीत जाण्याबद्दल सुचवले होते. खापर्डेंसह टिळक अमरावतीहून संगमनेरला आले. त्यांनीच टिळकांना शिर्डीत नेले. हे खापर्डे विद्वान वकील होते. व्यासंगी, प्रखर देशभक्त होते. फर्डे वक्ते, त्यांची अनेक भाषणे इंग्लडमध्ये गाजली होती. त्यांचा परिचय साईबाबा, गजाननमहाराज यांच्या सोबत होता. दादासाहेब यांनी रोजनिशी लिहिण्याचीसवय होती. 1894 ते 1938 या कालावधीतील 45 रोजनिशा आजही उपलब्ध आहेत. खापर्डे यांची रोजनिशी शिर्डी संस्थानने प्रकाशित केलीअसून, साईलिला मासिकाच्या अंकात ऑगस्ट 1985 ला प्रकाशितकरण्यात आली आहे. साक्षिभूत दस्तावेज म्हणून या रोजनिशीकडे पाहिलेजाते.संस्थानने ही रोजनिशी प्रकाशित केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या