Thursday, April 25, 2024
Homeनगरशिर्डी संस्थानच्या 588 कंत्राटी कामगारांना कायम नियुक्त्या

शिर्डी संस्थानच्या 588 कंत्राटी कामगारांना कायम नियुक्त्या

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- साईबाबा संस्थानच्या कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या सन 2001 ते 2004 पर्यंतच्या मात्र सध्या कामावर हजर असलेल्या 635 कामगारांपैकी 588 कामगारांना साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या सेवेत सामावून घेण्याच्या ऑर्डर देण्यात आल्या असल्या तरी उर्वरित कर्मचार्‍यांवर आजही टांगती तलवार असल्याने ‘कही खुशी कही गम’चे चित्र दिसून आले.

2006 मध्ये कायम करण्यात आलेल्या कामगारांमध्ये गैरहजेरीच्या कारणास्तव वगळण्यात आले होते. त्यानंतर या कर्मचार्‍यांनी प्रामाणिकपणे 13 वर्ष काम करीत शिक्षा भोगली. मात्र आता पुन्हा त्यांना याच गैरहजेरीच्या कारणास्तव वगळण्यात आल्याने या कामगारांमध्ये प्रचंड नाराजी बघायला मिळाली.

- Advertisement -

साईबाबा संस्थानच्या कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या 2001 ते 2004 पर्यंतच्या सध्या कामावर असलेल्या 635 कामगारांना शासनाच्या वतीने संस्थांकडे वर्ग करण्यासाठी हिरवा कंदील दाखवून मंजुरी देण्यात आली होती. नवीन वर्षाच्या पहिल्या गुरुवारी अखेर साईबाबा संस्थानच्या वतीने 635 पैकी 588 कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या कामगारांना साईबाबा संस्थानच्या सेवेत सामावून घेण्याच्या ऑर्डर मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते देण्यात आल्या.

यामुळे ज्यांंना सेवेत सामावून घेतले त्या कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले तर दुसरीकडे वगळण्यात आलेल्या कर्मचार्‍यांच्या चेहर्‍यावर दुःख, 635 कामगारांच्या यादीमध्ये उर्वरित 47 कामगारांपैकी एका कर्मचार्‍याचे डबल नाव गेल्याचे समजले तसेच काही मयत झाले आहे. काही कर्मचारी वयाच्या अटी शर्तीनुसार रिटायर झाले तर काही सोडून गेले. राहिलेले 19 कर्मचारी आजही गैरहजेरीच्या कारणास्तव डबल शिक्षेस पात्र ठरवल्याने आमच्यावर अन्याय झाल्याचे सांगून साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीचा अंत झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान संस्थानच्या वतीने शासनाकडे पाठविण्यात आलेल्या यादीमध्ये 2006 मध्ये गैरहजेरीच्या कारणास्तव देण्यात आलेल्या या 19 कामगारांचा समावेश होता त्याची शिक्षा या कर्मचार्‍यांनी एकदा भोगली होती. तेरा वर्षांनंतर त्यांचे या 635 लोकांच्या यादीत नावे आल्याने त्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून आला होता, मात्र पुन्हा साईबाबा संस्थान प्रशासन व्यवस्थापनाने त्यांना गैरहजेरीच्या कारणास्तव वगळल्याने त्यांना संस्थानच्या सेवेत सामावून घेतले नाही.दि. 22 ऑगस्ट 2004 पर्यंतच्या आजतागायत कामावर असलेल्या 635 कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराकडून वगळून साईबाबा संस्थानकडे वर्ग करण्यात यावे.

यासाठी शासनाने सर्व कामगारांची नावासह यादी साईबाबा संस्थानला पाठवली होती. त्यानंतर यादीतील सर्व कर्मचार्‍यांचे गैरहजर रेकॉर्ड तपासण्यात आले. यामध्ये 588 कर्मचारी यांना संस्थानच्या सेवेत सामावून घेण्यासाठी हिरवा कंदील देण्यात आला असला तरी उर्वरित 19 कर्मचार्‍यांचा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.2006 ंच्या 1052 कामगारांच्या ऑर्डर निघाल्या त्यावेळी याच 19 कर्मचार्‍यांना गैरहजेरीच्या कारणास्तव वगळण्यात आले, तेव्हापासून आजपर्यंत तेरा वर्ष सातत्याने साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीचे पालन करीत काम करीत आहे, मात्र एका चुकीची दोन वेळा शिक्षा भोगावी लागल्याने आम्हाला आता आत्महत्या करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय शिल्लक राहिला नसल्याचे काही कर्मचार्‍यांनी बोलून दाखविले.

सध्या कामावर हजर असलेल्या 635 कामगारांपैकी 588 कामगारांना साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या सेवेत सामावून घेण्याच्या ऑर्डर देण्यात आल्या असल्या तरी उर्वरित 19 कामगारांची दोन दिवसांत छाननी करून त्यांनाही न्याय देण्यात येईल.
-दीपक मुगळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान

- Advertisment -

ताज्या बातम्या