शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना नोटीस
Featured

शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना नोटीस

Sarvmat Digital

उच्च न्यायालयाची परवानगी न घेता जमीन खरेदी केल्याप्रकरणी

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने ऐन लॉकडाऊनमध्ये खरेदी केलेल्या 14 कोटी 80 लाख रुपयांची जमीन खरेदी करताना उच्च न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक होते. मात्र शिर्डी नजीकच्या रुई शिवारात दहा हेक्टर जमीन खरेदी करतांना उच्च न्यायालयाची परवानगी न घेता चढ्या भावाने जमीन खरेदी केल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या अवमानप्रकरणी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना खंडपिठाची नोटीस बजावण्यात आली असून सहा आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

देशात तसेच राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित केले असतांना तसेच संस्थानचे उत्पन्न कमी असताना साईबाबा संस्थानने शिर्डी पिंपळवाडी रोडलगत रुई शिवारात ऐन लॉकडाऊनच्या काळात दहा हेक्टर जमीन सुमारे 14 कोटी 80 लाख रुपयांना खरेदी करण्यात आली आहे. सदरची जमीन खरेदी करण्यासाठी संस्थानने न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक होते. मात्र परवानगी न घेता चढ्या भावाने जमीन खरेदी करत असल्याचे कळताच शिर्डीतील उत्तमराव शेळके यांनी साई संस्थानला पत्रव्यवहार करुन सदर जमीन बाजार भावापेक्षा अधिक रकमेने विकत घेत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.

मात्र तरीही संस्थानने सदरचा जमीन व्यवहार पूर्ण केल्याने शेळके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात अवमानता याचिका दाखल केली आहे. औरंगाबाद खंडपिठातील याचिकाकर्त्याच्या वकीलाने दिलेल्या माहितीवरुन संबधीत जागेचा व्यवहार 15 मे 2020 रोजी अगदी घाईगडबडीत करण्यात आला असून तसेच जमीन खरेदी ही चढ्या भावाने झाली आहे, त्याचबरोबर दैनदिन खर्च वगळता इतर मोठ्या खर्चांसाठी खंडपिठाची परवानगी घेणे बंधनकारक असताना ही जमीन खरेदी केली आहे.

त्यामुळे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने साईबाबा संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना नोटीस बजावत सहा आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले असल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांनी सांगितले. दहा हेक्टर जमीन खरेदीचा प्रस्ताव सन 2011-12 पासून प्रलंबित होता तर लॉकडाऊनमध्ये श्री साईबाबा मंदिर बंद असतांना जमीन खरेदी करण्यात आली. साईबाबा संस्थानचे कामकाज पाहण्यासाठी चार सदस्यीय कमिटीची नेमणूक केली आहे असे असतांना कोट्यवधीची रुपयांची जमीन न्यायालयाची परवानगी न घेता बाजार भावापेक्षा अधिकच्या भावाने कशी खेरदी केली? असा प्रश्न स्थानिकांबरोबर भाविकांना पडला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com