Thursday, April 25, 2024
Homeनगरसंपूर्ण जगात सुरू असलेल्या साईचरित्र पारायण उपक्रमाची सांगता

संपूर्ण जगात सुरू असलेल्या साईचरित्र पारायण उपक्रमाची सांगता

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- करोनाच्या महामारीने जगात मृत्यूचे तांडव उभे केले असताना अनेकांना या महामारीने जखडून ठेवले आहे. तर करोना विरोधातील असलेल्या वॉरियर्सने करोनाला हरवून अनेकांना जीवनदान देत करोनावर मात करून पुनर्जन्म प्राप्त करून दिला आहे. मात्र हे सर्व काही परमेश्वराच्या व साईंच्या आशीर्वादाने शक्य झाले. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिर्डीतील साईनिर्माण उद्योग समूहाने गावातच नव्हे तर संपूर्ण जगात साईचरित्र पारायणाच्या माध्यमातून साईंचा नामजाप करत साईबाबांना साकडे घातले. गुरूवारी या अभुतपूर्व उपक्रमाचा समारोप झाला.

साईनिर्माणच्यावतीने करण्यात आलेल्या आव्हानास जगातील 27 देशातील लाखो साईभक्तांनी सहभाग नोंदवून प्रतिसाद देत अध्याय वाचनाचे फोटो सोशल मीडियावर पाठविले असून पवित्र साईचरीत्र ग्रंथाची महिमा विदेशात बघायला मिळत असल्याने आमचा उद्देश सफल होत असल्याचे अध्यक्ष विजय कोते यांनी सांगितले. लॉकडाऊन काळात साईनिर्माण उद्योग समुहाच्या माध्यमातून शिर्डीतून सुरू झालेल्या या उपक्रमाची व्याप्ती साईबाबांच्या ख्यातीप्रमाणे सातासमुद्रापार पोहचली. सलग पाच गुरुवार घेतलेल्या साईचरित्र पारायणामध्ये जगभरातील लाखो भाविकांनी सहभाग नोंदवून जगातून करोनामुक्तीसाठी साईंंना साकडे घातले.

- Advertisement -

करोनाने शिरकाव करताना जात, धर्म, पंथ काही बघितले नाही तसेच या महाभयंकर रोगाला रोखताना आणि विजय मिळवताना करोना योद्ध्यांनी देखील जात, धर्म, पंथ काही एक न पाळता अविरतपणे सेवा केली असून हीच तर साईबाबांची शिकवण आहे म्हणून सबका मालिक एक संदेश देणार्‍या साईनामाचा जयघोष संपूर्ण जगभरात झाला तो करोनाला रोखण्यासाठी, बाबांनी दिलेला मंत्र अर्थात सांगितलेली श्रद्धा आणि दाखवलेली सबुरी याप्रमाणेच देवदूतांवर म्हणजेच करोना वॉरियर्सवर श्रद्धा ठेवून सबुरीने लाखो जणांनी मात केली.

हे सर्व साईबाबांनी दिलेल्या आत्मबळामुळे शक्य झाले. त्याची प्रचीती म्हणून साईनिर्माण उद्योग समूहाने मानवतेच्या धर्माला जाणून जगातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी व करोना मुक्तीसाठी साईबाबांना साईचरित्राच्या माध्यमातून प्रार्थना केली. ही प्रार्थना जगभरात करोनामुक्ती संपुष्टात आणू शकेल हाच आशावाद यानिमित्ताने जगभरातील साईभक्तांनी व्यक्त केला असल्याचे विजय कोते यांनी सांगितले. जगभरातील करोना योद्ध्यांचा सन्मान व करोनाग्रस्तांचे मनोबल वाढविण्यासाठी भाविकांनी घरात दर गुरुवारी साई चरित्रातील पहिला अध्याय वाचन केले. या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून भारतासह 27 देशांतील लाखो भक्तांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.

साईबाबांचा आशीर्वाद आणी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईनिर्माणचे संस्थापक अध्यक्ष विजयराव कोते यांचे निरपेक्ष भावनेने गांव तिथे साईचरित्र पारायण या संकल्पनेच्या माध्यमातून संपूर्ण देश विदेशातील भाविकांशी अतुट नाते तयार झाले आहे. यामुळेच साईनिर्माण उद्योग समूहाने राबवलेल्या या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. हेच भाविक शिर्डीत जेव्हा साईंच्या दर्शनासाठी येतात तेव्हा या सर्वांना साईनिर्माणच्या माध्यमातून वेळोवेळी मार्गदर्शन तसेच त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळ दिला जातो. यामुळेच साईनिर्माण परीवार एकमेकांशी जोडला गेल्याने जगभरातील भाविकांनी साईनिर्माणच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
– पंकज लोढा, शिर्डी

जगभरातील करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व परिचारिका रुग्णालयातील सफाई कर्मचारी पोलीस व महसूल अधिकारी तसेच कर्मचारी हे जगभरातील करोना योद्धे असून ते देत असलेल्या लढ्यासाठी त्यांचे आत्मबल वाढावे तसेच त्यांचा सन्मान करण्याची व करोना बाधितांना आपुलकीची वागणूक देण्याची प्रेरणा सर्वांना मिळावी या उदांत हेतूने आम्ही घेतलेल्या साईचरीत्र पारायण उपक्रमांची गुरुवारी सांगता झाली असून यामधून जगभरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
– विजय कोते, संस्थापक अध्यक्ष, साईनिर्माण उद्योग समुह, शिर्डी

- Advertisment -

ताज्या बातम्या