साईबाबा रुग्णालयातील डॉक्टरांसह 12 जणांचे सर्व अहवाल निगेटीव्ह
Featured

साईबाबा रुग्णालयातील डॉक्टरांसह 12 जणांचे सर्व अहवाल निगेटीव्ह

Sarvmat Digital

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- देशविदेशातील भाविक शिर्डीत येऊन गेले परंतु साईबाबांच्या शिर्डी नगरीत अजून एकही रुग्ण मिळून आला नाही हा चमत्कार आहे. मात्र शिर्डी नजीकच्या निमगाव कोर्‍हाळेत एका महिलेचा रिपोर्ट पाँझिटीव्ह आल्याने तिच्या संपर्कात आलेल्या शिर्डीतील साईबाबा स्पेशालिटी रुग्णालयातील दोन डॉक्टरांसह12 जणांना नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी सर्व म्हणजे 12 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी माहिती दिली.

राहाता तालुक्यातील निमगाव कोर्‍हाळे येथील एका 53 वर्षीय भाजी विक्रेत्या महिलेला करोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच शिर्डी शहर व परिसरात खळबळ उडाली होती. करोनाग्रस्त महिला प्रथम तपासणीसाठी साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आली असल्याने तिच्या संपर्कात येणार्‍या रुग्णालयातील दोघा डाँक्टरसह एकूण बारा जणांना गुरुवारी मध्यरात्री संस्थानच्या बसमधून नगरला शासकीय रुग्णालयात तपासणी करण्यासाठी रवाना करण्यात आले होते.

यामध्ये सुरुवातीला बारा जणांपैकी फक्त पाच जणांचे स्वँबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यानंतर रात्री उशिरापर्यंत उर्वरित सात जणांचे स्वँबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. या बारा जणांचे अहवाल शुक्रवारी सकाळी प्राप्त झाले असून सर्वाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर असलेले संकट टळले आहे.

रुग्णालयातील गर्दीचे असलेल्या ठिकाणी एमआरआय, एक्सरे, अतिदक्षता विभाग आदी ठिकाणी दर तासाला हायपोक्लोराईटची औषधांची फवारणी करून पूर्णपणे निर्जंतुक करण्यात येत आहे. दरम्यान आजची परिस्थिती पाहता रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण हा रुग्णालयात काम करणार्‍या डॉक्टर, नर्स तसेच कर्मचार्‍यांच्या दृष्टीने धोकादायक आहे.

त्यामुळे प्रत्येकाने आपल्या स्वतःची काळजी घेऊन काम करणे गरजेचे आहे. साईबाबा संस्थानच्या या सर्व बारा कर्मचार्‍यांना शुक्रवारी दुपारी संस्थानच्या बसमधून शिर्डीत आणण्यात आले आहे मात्र या लोकांना दहा दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी साईबाबा संस्थानच्या द्वारावती भक्तनिवासात व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी संस्थान कर्मचारी यांच्याकडून होत आहे.

‘त्या’ महिलेच्या नातीच्या संपर्कात आलेले शिर्डीतील लोक जिल्हा रुग्णालयात रवाना

शिर्डी (शहर प्रतिनीधी)- शिर्डी शिवलगत असलेल्या निमगाव येथील 53 वर्षिय भाजी विक्रेत्या महिला करोनाची लागण झाल्याचे समजताच तिच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील 29 व्यक्ती आणि नातेवाईक यांना तातडीने नगर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्या स्त्रावाचे नमुने घेण्यात आले होते. स्राव तपासणीनंतर यापैकी चार व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यामध्ये एक महिला, एक मुलगी व दोन पुरूष असल्याची माहीती स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान यातील एक मुलगी शिर्डीत असल्याने प्रशासनाचे तातडीने पथक पाठवून तेथील लोकांना तपासणीसाठी ताब्यात घेऊन नगर येथील शासकीय रुग्णालयात रवाना केले आहे. या घटनेने शिर्डी शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

निमगाव येथील महिलेचा रिपोर्ट पाँझिटीव्ह येताच तालुका प्रशासनाची झोप उडाली आहे गुरुवारी दिवसभर प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय योजना राबविण्यात आल्या असून त्यानंतर महिलेच्या संपर्कातील लोकांना नगर येथे हलविण्यात आले होते यामध्ये चार जणांचे रिपोर्ट पाँझिटीव्ह आल्याने मोठा धक्का बसला आहे.यातील एक मुलगी ही शिर्डीत वास्तव्यास असल्यानं निमगाव बरोबर शिर्डीतील पिंपळवाडी रोडवरील सर्व दुकाने बंद करण्यात आले आहे.

सदर मुलीने वास्तव्यास असलेल्या ठिकाणी फिरत असल्याचे सांगितले असून कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही तसेच खबरदारीचे उपाय म्हणून शिर्डी नगरपंचायतने ही दुकाने बंद केली असून वरिष्ठ आधिकार्‍यांबरोबर मिटींग होवून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सतिष दिघे यांनी सांगितले आहे.

पोलीस प्रशासनाच्यावतीने शिर्डीतील सिमेवर बंदोबस्त ठेवण्यात आला असून सिमा बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानंतर निमगाव आणि शिर्डी परिसरात मोठी खळबळ उडाली. सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून या सर्वांच्या संपर्कात कोण कोण आले आहे यांचा शोध सुरू झाला आहे. त्यामुळे निमगाव बरोबरच शिर्डीतील नविन पिंपळवाडी रोड आणि परिसरातील काही भागातील दुकाने सध्या शंभर टक्के बंद करण्यात आले असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, घरात रहा सुरक्षित राहा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com