आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
Featured

आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

Sarvmat Digital

1 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन अर्ज भरता येणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यभरातील शाळांमध्ये वंचित व अर्थिकदृष्ट्या दूर्बल घटकांसाठी 25 टक्क्यांवरील राखीव कोट्यातील प्रवेशाचे वेळापत्रक प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शनिवारी (दि.18) जाहीर केले. त्यानुसार आरटीई प्रवेशासाठी पालकांना 11 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर प्रवेशाची पहिली लॉटरी 11 आणि 12 मार्च रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले. जिल्ह्यातून गेल्या वर्षी आरटीई प्रवेशासाठी 352 शाळा पात्र होत्या. यंदा त्यात वाढ होणार आहे.

राज्यातील इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीच्या प्रवेशासाठी 25 टक्के जागा मागासवर्गीय तसेच अर्थिक दूर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. या जागांवर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत शिक्षण दिले जाते.शाळेपासून 1 ते 3 किलो मीटरच्या अंतरावर राहत असलेल्या पालकांच्या पाल्यांना प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाते. पहिल्या फेरीत एक किलोमीटरच्या आत राहणार्‍या विद्यार्थ्यांचा, त्यानंतर त्यापेक्षा दूर राहणार्‍या विद्यार्थ्यांचा विचार केला जातो. दरम्यान प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास विलंब होत आहे.

गेली काही वर्षे आरटीई अंतर्गतच्या 25 टक्के राखीव जागा पूर्ण भरण्यात शिक्षण विभागाला सातत्याने अपयश येत आहे. त्यामुळे यंदा तरी प्रवेश प्रक्रिया अचूक आणि वेगवान राबवून जास्तीत जास्त जागा भराव्यात अशी मागणी आरटीई प्रवेशासाठी काम करणार्‍या संघटनांनी केली आहे.

शाळा स्तरावर अ‍ॅलोटमेंट नंतर पालक थेट शाळेत गेल्यानंतर अडचणी निर्माण होतात. त्यामुळे कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कागदपत्रे पडताळणी समिती तयार करण्यात येणार आहे. यामध्ये एक गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी,पालक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षकांचे प्रतिनिधी, पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी, स्वंयसेवी संघांचे प्रतिनिधी असे प्रत्येकी दोन प्रतिनिधी आणि एक विस्तार शिक्षणाधिकारी अशा एकूण 20 सदस्यांची समिती कागदपत्रे पडताळणीचे काम पाहणार आहे.

असे आहे वेळापत्रक…
शाळा नोंदणी- 21 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत
ऑनलाइन अर्ज करणे 11 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी
पहिली लॉटरी – 11 आणि 12 मार्च
प्रवेश घेणे – 16 मार्च ते 3 एप्रिल
प्रतिक्षा यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे टप्पा एक – 13 ते 18 एप्रिल
प्रतिक्षा यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे टप्पा दोन – 24 ते 29 एप्रिल
प्रतिक्षा यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे टप्पा तीन 6 ते 12 मे
प्रतिक्षा यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे टप्पा चार 18 ते 22 मे

Deshdoot
www.deshdoot.com