Friday, April 26, 2024
Homeनगररोजगार हमीची कामे सुरू होणार !

रोजगार हमीची कामे सुरू होणार !

जिल्हा परिषदेने दिली 106 विहिरींच्या कामांना मंजुरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- रोजगार हमीची कामे सुरू करण्यास केंद्र आणि राज्य सरकारने मंजुरी दिल्यानेे जिल्हा परिषद प्रशासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हाभरात 108 सिंचन विहिरींच्या कामांना मंजुरी दिली असून,यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुमारे महिनाभराच्या बे्रकनंतर रोजगार हमीच्या कामांना पुन्हा सुरूवात होणार आहे.

- Advertisement -

कोरोना विषाणूमुळे सद्यस्थितीत राज्य शासनाने लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे रोजगार हमीवर काम करणार्‍या लोकांना काम नसल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लोकांना काम देऊन त्यांना मंजुरी अदा करून मदत करता येईल. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद माग्रारोहयो कक्षाने तातडीने 108 सिंचन विहिरीच्या कामांना मंजुरी दिली आहे.

सिंचन विहिरींची कामे सुरू करण्याचे आदेशही जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आले आहेत. या कामामुळे मजुरांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या व्यतिरीक्त जिल्हा परिषदेने पंचायत समिती स्तरावर मंजुरी दिलेली 1 हजार 348 कामांची यादी तालुक्यांना पाठविण्यात आली आहे. ही कामे सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामरोजगार सेवक व तालुकास्तरावरील तांत्रिक सहाय्यक यांना मजुरांची काम मागणी घेण्याकरिता संबंधित लाभार्थ्यास भेट देऊन कामाची मागणी प्राप्त करून घेण्याची कार्यवाही करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

ज्या ग्रामपंचायतीमध्ये वैयक्तिक काम मंजूर नसल्यास सामाजिक अंतर ठेऊन (सोशल डिस्टन्स) सार्वजनिक कामे सुरू करण्यात यावीत. कामे घेताना मजुरांना घरगुती मास्कचा वापर करण्याच्या सूचना द्याव्यात. मजुरीचे प्रदाने हजेरीपत्रक संपल्यांनंतर 8 दिवसांच्या आत करण्यात येईल याची दक्षता घ्यावी. या कामांसाठी मजुरांना प्रति दिन 238 रुपये मजुरी मिळणार आहे.

तालुकानिहाय मंजूर कामे
संगमनेर 10, अकोले 3, श्रीरामपूर 1, कोपरगाव 3, कर्जत 3, जामखेड 40, नगर 11, नेवासा 2, पाथर्डी 11, पारनेर 11, शेवगाव 9, श्रीगोंदा 4 असे एकूण 108 अशी आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या