Wednesday, April 24, 2024
Homeनगरमुबलक पावसानंतरही ‘रोहयो’ दसहजारी!

मुबलक पावसानंतरही ‘रोहयो’ दसहजारी!

चार महिन्यांत सात हजारांनी वाढले मजूर उन्हाळ्यात यंदाची उंच्चाकी संख्या होणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत 162 टक्के पाऊस झाल्यानंतर देखील रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या फेबु्रवारी महिन्यांत 10 हजारांच्या पुढे गेली आहे. चार महिन्यांपूर्वी जिल्ह्यात झेडपी आणि यंत्रणा या दोन्ही ठिकाणी मिळून 3 हजार मजूर रोजगार हमीच्या कामावर होते. त्या देखील आता 7 हजारांनी वाढ झाली आहे. यामुळे यंदा उन्हाळ्यात यावर्षीची रोजगार हमीवरील उंच्चाकी उपस्थिती राहणार असल्याचा अंदाज प्रशासनाला आहे.

- Advertisement -

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) सुरू असलेल्या कामांवरील मजुरांची संख्या फेब्रुवारी महिना सुरू होताच वाढू लागली आहे. ही संख्या दहा हजारांपर्यंत पोहोचली असून सध्या जिल्ह्यात रोहयोची दोन हजार 372 कामे सुरू आहेत. त्यावरील मजुरांची संख्या 10 हजार 367 एवढी आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीत गरज असेल, त्या प्रत्येकाला रोजगार पुरविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली होती.

त्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत लोकांना रोजगार देण्यात आला. दुष्काळाची दाहकता तीव्र झाल्याने मार्च 2019 पर्यंत रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांवरील मजुरांची संख्या 18 हजारांपर्यंत गेली होती. मात्र, जून महिन्यानंतर या योजनेवर काम करणार्‍या मजुरांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली होती. नोव्हेंबर 2019 पर्यंत तर रोहयोअंतर्गत सुरू असलेल्या कामांवरील मजुरांची संख्या तीन हजारांपर्यंत आली होती.

आता मात्र, फेब्रुवारी महिना सुरू होताच हळूहळू पुन्हा रोहयोअंतर्गत सुरू असलेल्या कामांवरील मजुरांची संख्या वाढू लागली आहे. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायतअंतर्गत एक हजार 728 कामे सुरू असून, यावर 5 हजार 876 मजूर सध्या काम करीत आहेत. विविध यंत्रणांच्या अंतर्गत 644 कामे सुरू असून, यावर 4 हजार 436 मजूर काम करीत आहेत.

एकंदरीत सध्या रब्बी हंगामातील शेतीची कामे अंतिम टप्प्यात आली असल्याने आता आगामी काळात हाताला मिळेल ते काम करण्याची वेळ ग्रामीण भागातील नागरिकांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळेच रोहयो अंतर्गत सुरू असलेल्या कामांवर मजुरांची संख्या वाढू लागली असून, आगामी एक ते दोन महिन्यांमध्ये ही संख्या 15 हजारांच्या पुढे जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

तालुकानिहाय मजुरांची उपस्थिती : जिल्ह्यात सध्या रोहयोअंतर्गत अकोले तालुक्यात 305 ठिकाणी कामे सुरू असून, तेथील मजुरांची उपस्थिती 1129 एवढी आहे. याशिवाय जामखेड तालुक्यात 251 कामांवर 930 मजूर, कर्जतमध्ये 189 कामांवर 1083, कोपरगावमध्ये 168 कामांवर 382, नगरमध्ये 116 कामांवर 662, नेवाशात 98 कामांवर 664, पारनेरमध्ये 144 कामांवर 580, पाथर्डीत 175 कामांवर 983, राहात्यात 159 कामांवर 530, राहुरीत 200 कामांवर 466, संगमनेरमध्ये 182 कामांवर 936, शेवगावात 127 कामांवर 797, श्रीगोंद्यात 211 कामांवर 799 व श्रीरामपूर तालुक्यात 67 कामांवर 371 मजुरांची उपस्थिती आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या