पाथरे खुर्दला दोन ठिकाणी धाडसी चोरी
Featured

पाथरे खुर्दला दोन ठिकाणी धाडसी चोरी

Sarvmat Digital

सात तोळे सोने व 35 हजाराची रोकड पळविली

माहेगाव/वळण (वार्ताहर)- राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथे एकाच रात्री दोन घरात जबरी चोरी झाली. चोरट्यांनी 35 हजार रोकड आणि सात तोळे सोने चोरून ते पसार झाले. या घटनेमुळे राहुरीच्या पूर्वभागातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. पाथरे खुर्द येथील मांजरी रोड येथील दत्तात्रय अंबादास टेकाळे यांच्या वस्तीवर मंगळवारी रात्री चोर आले. घराच्या पाठीमागील बाजूच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला.

घरातील सामानाची उचकापाचक करून घरातील पेट्या उचलून जवळच्या शेतात नेऊन उचकल्या. त्यात त्यांच्या मुलीचे सहा तोळे सोने व वीस हजार रुपये रोख असा ऐवज चोरांनी पळविला. नंतर चोरांनी आपला मोर्चा त्याच गावातील शेनवडगाव रोडला असणारे शेतकरी गंगाधर विश्वनाथ जाधव यांच्या घराकडे वळविला. जाधव यांनी आपले नवीन घर बांधल्याने आपले सर्व सामान नवीन घरात आणून ठेवले व झोपण्यासाठी ते जुन्या घरी गेले. त्याचा फायदा घेत चोरांनी घराचे कुलूप-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

घरातील सर्व सामानाची उचकापाचक करून घरातील लोखंडी पेटी उचलून घरासमोरील शेतात नेऊन कुलूप तोडून पेटीतील 15 हजार रुपये व एक तोळा सोने घेऊन चोर पसार झाले. झालेला प्रकार टेकाळे यांच्या सकाळी सहा वाजता लक्षात आला. तर जाधव हे पहाटे पाच वाजता नवीन घरी आल्यानंतर आपल्या घराचे दरवाजे उघडे असल्याचे पाहून घरात गेल्यानंतर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी राहुरी पोलिसांना फोन करून माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.

या घटनेने परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. मात्र, श्वानाने ज्या ठिकाणी पेट्या तोडल्या, तेथपर्यंतच माग काढल्याने पुढे चोर वाहनात पसार झाले असावे असा अंदाज करण्यात आला आहे. या परिसरात अशा लहान मोठ्या अनेक घटना घडतात. तरी या भागात पोलीस आऊट पोस्ट चौकी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com