Saturday, April 27, 2024
Homeनगरश्रीगोंदा : आदिवासी महिलेच्या घरावर दरोडा

श्रीगोंदा : आदिवासी महिलेच्या घरावर दरोडा

धारदार शस्त्राने वार करीत, पीडितेस अत्याचाराची धमकी

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर घोडेगाव रोड नजीक असलेल्या, भोळेवस्ती या परिसरात एकांत ठिकाणी राहत असलेल्या आदिवासी भटक्या समाजाच्या महिलेच्या झोपडीवर दि. 14 एप्रिलच्या मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अज्ञातांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत दरोडा टाकला. यावेळी पीडितेने स्वसंरक्षणासाठी विरोध केला असता,तिच्या डाव्या हाताला अंगठ्या पाशी वार झाल्याने दुखापत झाली आहे.

- Advertisement -

मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजीच्या मध्यरात्री पीडित महिला राहत असलेल्या ठिकाणी तिच्या 12 वर्षाच्या मुलीसोबत झोपडी बाहेर झोपली असताना तोंड बांधून आलेल्या जवळपास सात अज्ञात चोरांनी झोपेलेल्या ठिकाणी घेरून पाहणी करण्यास सुरुवात केली. यानंतर जागे झालेल्या त्या महिलेला शस्त्राचा धाक दाखवून, गळ्यातील सोन्याचे डोरले ओरबाडले. महिलेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, तिच्या डाव्या हातावर एकाने वार केला. उर्वरित बाकी जणांनी झोपडीमध्ये शिरून जीवनावश्यक वस्तूंची उचकापाचक करीत घरामध्ये पैसे शोधण्याचा प्रयत्न केला.

आता तुमच्यावर बलात्कार करणार असल्याची धमकीही पीडितेला दिली. मात्र, महिलेने लहान मुलीसाठी गयावया करून तुम्हाला काय न्यायचे ते न्या. पण माझ्या मुलीला सोडा म्हणल्याचे ती सांगते, साधारण अर्धा तास चोरांनी या महिलेच्या झोपडीमध्ये शोधाशोध केली. यानंतर ते घोडेगावच्या दिशेने निघून गेल्याचे त्या महिलेने पोलिसांना सांगितले आहे.

घटना घडल्यानंतर घाबरलेली महिला मदतीसाठी धावत पळत तिच्या घरापासून जवळच असलेल्या चंदन घोडके यांच्या घरी मध्यरात्री तिने दार ठोठावत मदत मागितली. यानंतर घोडके यांनी श्रीगोंदे पोलीस स्टेशनला फोनवरुन माहिती दिली.

माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सतीश गावित हे घटनास्थळी आले. परिस्थितीची पाहणी करून वरिष्ठांना कळविण्यात आले. त्यानुसार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक श्रीगोंदा दौलतराव जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, स्वान पथक व फिंगर प्रिंटचे पोलीस कर्मचार्‍यांसह मोबाईल सेलचे दीपक शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.

रात्री पीडित महिलेने शासकीय ग्रामीण रुग्णालयमध्ये उपचार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव करीत आहेत.

घटनास्थळी रात्री श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. यावेळी पीडितेच्या घरापासून साधारण एक किलोमीटर अंतरावरील दक्षिण पूर्वेकडील चारीजवळ श्वान पथकाने माग काढला आहे. याठिकाणी स्वतः पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंग यांनी थांबून हे प्रकरण हाताळले आहे.काही संशियतांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या