Friday, April 26, 2024
Homeनगरचाकूचा धाक दाखवून टेम्पो चालकाकडील दीड लाख लुटले

चाकूचा धाक दाखवून टेम्पो चालकाकडील दीड लाख लुटले

नगर-औरंगाबाद रोडवर खडका शिवारात सकाळी साडेनऊची घटना

 नेवासा (तालुका प्रतिनिधी) – नगर-औरंगाबाद रोडवर खडका टोल नाक्याचे पुढे रोडचे कडेला खडका गाव शिवारात चाकुचा धाक दाखवून टेम्पो चालकास 1 लाख 52 हजार 600 रुपयास लुटल्याची घटना सोमवार दि. 4 मे रोजी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत टेम्पो चालक व मालक राजकुमार दिलीप चव्हाण (वय 32) रा. बल्सा रोड नामदेवनगर, जिंतूर जि.परभणी याने नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझेकडे अशोक लेलेंड कंपनीचा दोस्त प्लस टेम्पो नंबर (एमएच 21 बीएच 0906) असून तो माझ्याच नावावर आहे. तो मीच चालवितो. माझ्या टेम्पोवर क्लिनर म्हणून किशन सुरवशे हे असून ते जिंतूरचे राहणारे आहेत. 3 मे रोजी सायंकाळी 5 वाजता माझ्या टेम्पोत जिंतूर एमआयडीसीमधील कंपनीतून दोरीचा माल घेऊन अहमदनगरकडे रात्री 9 वाजता निघालो.

अहमदनगर येथे सकाळी 7 वाजता गांधी ट्रेडर्स येथे माझी गाडी रिकामी केली. त्यानंतर गांधी यांनी मला मालाचे एकूण 1 लाख 36 हजार 600 रुपये रोख दिले. त्यामध्ये 68 नोटा दोन हजार रुपये दराच्या व 3 नोटा दोनशे रुपये दराच्या होत्या. तसेच माझ्याजवळ 16 हजार रुपये रोख रक्कम होती. त्यामध्ये 500 रुपये दराच्या 32 नोटा होत्या.

4 मे रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास मी तसेच क्लिनर किशन सुरवशे असे दोघे जण जिंतूर येथे जाण्यासाठी टेम्पो घेऊन निघालो. अहमदनगर-औरंगाबाद रोडवर खडका टोल नाक्याच्यापुढे रोडच्या कडेला खडका गाव शिवारात सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास टेम्पो झाडा खाली लावून जेवणाकरिता थांबलो. साडेनऊ वाजता तेथील झाडाखाली जेवण करून गाडीकडे जात असतानाच तेथे एक स्प्लेंडर मोटारसायकलवर एक इसम आला.

तो मोटारसायकल लावून आमच्याकडे आला व आम्हाला शिव्या दिल्या. हातात दगड उचलला व चाकू काढून दाखविला तोच त्याने माझे हातातील गाडीची चावी घेतली तसेच माझे पॉकिट व मोबाईल काढून घेतले व माझे पॅन्टच्या खिशातील 16 हजार हजार रुपये बळजबरीने चोरून घेतले. त्यानंतर त्याने माझ्या टेम्पोचे लॉक खोलून टेम्पोचे डिकीमधील 1 लाख 36 हजार 600 रुपये रोख रक्कम चोरून घेतले. सदर इसम जात असताना त्याने टेम्पो लॉक करून घेतला व माझे पाकिटात ठेवलले ड्रायव्हींग लायसन काढून घेऊन माझा मोबाईल फोन व पाकीट हे तेथे टाकून दिले व तो त्याच्या मोटारसायकलने अहमदनगरच्या दिशेने निघून गेला.

स्प्लेंडर मोटार सायकलवरून आलेल्या अनोळखी इसम अंगाने मध्यम, उंची 5 फूट, अंगात पांढर्‍या रंगाचा शर्ट, काळपट निळ्या रंगाची पॅन्ट , चेहरा उभट, नाक सरळ, डोळे काळे, रंगाने काळा सावळा, वय अंदाजे 30 ते 35 वयोगटातील डोक्यावर दोन्ही बाजूने थोडेस टकल पडलेले व केस मोठे व मागे घेतलेले असे सदर स्प्लेंडर मोटार सायकल वरून आलेल्या अनोळखी इसमाचे वर्णन आहे. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 392 प्रमाणे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. ठाकूर करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या