दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद
Featured

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

Sarvmat Digital

दोघे फरार : स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाची कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. दोन दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले.

लंगड्या अंकुश काळे (वय- 40), पिंट्या उर्फ अशोक पांडा पवार (वय- 35), ज्वाल्या उर्फ ठोल्या लंगड्या काळे (वय- 17, तिघे रा. रांजणगाव मशिद ता. पारनेर) व शेखर उर्फ अतुल उदाशा भोसले (वय- 19 रा. कोळगाव ता. श्रीगोंदा) असे अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. दौल्या संजय भोसले, हुल्या पंडित भोसले (दोघे रा. तोंडेवाडी, कोळगाव ता. श्रीगोंदा) पसार झाले.

लंगड्या काळे चार ते पाच साथीदारांसह दोन मोटर सायकलवरून विसापूर ते पारनेर या रस्त्यावर दरोडा टाकण्यासाठी जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना बुधवारी (दि. 22) सायंकाळी मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, पोलीस नाईक सुनील चव्हाण, संदीप पवार, रविंद्र कर्डिले, ज्ञानेश्वर शिंदे, विश्वास बेरड, जालिंदर माने, बाळासाहेब भोपळे यांच्या पथकाने नगर-पुणे रोडवरील म्हसणे फाटा चौकात बुधवारी रात्री सापळा लावला. तेथे आरोपी दोन दुचाकीवरून पोहोचले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच दुचाकीच्या पाठीमागे बसलेले दोन जण मोटरसायकलवरून उड्या मारून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

पथकाने पाठलाग केला परंतु अंधाराचा फायदा घेऊन ते पसार झाले. त्यानंतर दोन्ही दुचाकीवरील चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकी, दोन तलवारी, एक लाकडी दांडके, एक लोखंडी कटावणी व दोन मोबाईल असा एकूण 48 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस नाईक विश्वास बेरड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात भादंवि कलम 399, 402, आर्म अ‍ॅक्ट कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com