श्रीरामपूरचे दरोडेखोर व पोलिसांत धुमश्चक्री
Featured

श्रीरामपूरचे दरोडेखोर व पोलिसांत धुमश्चक्री

Sarvmat Digital

पोलिसांकडून हवेत गोळीबार; दगडफेकीत पोलीस निरीक्षक जखमी; नेवासा नजिकच्या भेंडाळ्याची घटना

अहमदनगर (प्रतिनिधी)- मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या श्रीरामपूर आणि गुरूधानोराचे दरोडेखोर व गंगापूर पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी हवेत गोळीबार केला. यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीमध्ये पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे हे जखमी झाले असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही घटना औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर भेंडाळ्याजवळ घडली.

मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास महामार्गावर पाच दरोडेखोर घातक शस्त्रांसह दरोडा घालण्याच्या हेतूने फिरत असल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार गंगापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली महामार्गाकडे धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच पाच दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या पथकावर दगडफेक करून हल्ला चढवला. या वेळी पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांना दगडाचा मार लागल्याने ते जखमी झाले.

त्यामुळे सुरवसे यांनी त्यांच्या सर्व्हिस पिस्टलमधून दोन राउंड हवेत गोळीबार केल्यानंतर दरोडेखोरांनी मिळेल त्या दिशेने पळायला सुरुवात केली. त्यातील एक दरोडेखोर गंगापूरकडे जाणार्‍या अंतापूर शिवाराच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. इतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या वेळी अटक केलेल्या दरोडेखोराचे नाव अमोल सोपान पिंपळे (19) असून त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या इतर साथीदारांची नावे दादा गोविंद साळुंके (रा. खोकर), साजन पवार (रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर), आदित्य शामराव पवार (गुरुधानोरा, ता. गंगापूर) व सागर अशी आहे. आरोपीकडून दोन चोरीच्या मोटारसायकल, एक सत्तूर, दोर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक एम.डी सुरवसे यांच्यासोबत पीएसआय अर्जुन चौधर, पीएसआय रामहरी चाटे, पोहेका जितेंद्र बोरसे, विजय भिल्ल, भागचंद कासोदे, बंडू कुचेकर, चालक दत्तात्रय गुंजाळ व चालक शेख रिझवान इब्राहिम यांनी सहभाग घेतला.

Deshdoot
www.deshdoot.com