गुंगीच्या पदार्थाचा वापर करून 77 हजार रुपये लुटले
Featured

गुंगीच्या पदार्थाचा वापर करून 77 हजार रुपये लुटले

Sarvmat Digital

राहुरी कारखाना स्टेट बँक परिसरातील घटना

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर) – राहुरी कारखाना येथील स्टेट बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या दत्तात्रय निवृत्ती होले या तरुणास पेन मागण्याचा बहाणा करून नाकाजवळ गुंगीचा पदार्थ नेल्याने त्यास बँकेबाहेर नेऊन खिशातील 77 हजार रुपये काढून घेतले. विशेष म्हणजे हे दोन भामटे दीड ते दोन तास बँकेच्या आत थांबून सावज शोधीत असतानाही बँक सुरक्षा रक्षकाने साधे हटकले सुध्दा नाही.

राहुरी कारखाना येथील स्टेट बँकेत दुपारी काल 2.30 वाजता दत्तात्रय निवृत्ती होले हे पैसे भरण्यासाठी गेले. लुटणारे दोन तरुण त्यापूर्वी बँकेत होते. होले यांनी पैसे जमा करण्याची पावती भरत असताना यातील एक तरुणाने दोन ते तीन वेळा पेन मागण्याच्या बहाण्याने पावतीवरील 83 हजार रुपयांचा आकडा बघून घेतला. त्याच्या दुसर्‍या साथीदाराला इशारा करून होले यांच्या पाठीमागे हे दोन तरुण सातत्याने फिरत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतात. परंतु बँकेचे कॅमेरे क्वॉलिटीचे नसल्याने लुटरूंचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. बँकेची सुरक्षा व्यवस्था कुचकामी असल्याचे आजच्या लुटीवरून लक्षात आले.

होले यांनी आदर्श पतसंस्थेतून 45 हजार रुपये काढले. 38 हजार रुपये खिशातील असे एकूण 83 हजार रुपयाची रक्कम बँकेत भरण्यासाठी घेऊन गेले होते. बँकेत गेल्यानंतर या दोन लुटारूनी हाताला गुंगीचे औषध लावून पेन मागण्याच्या बहाण्याने नाका जवळ हात नेवून गुंगीचा परिणाम होण्यास सुरुवात झाल्यानंतर होले यांना बँकेबाहेर नेऊन बँकेपासून सुमारे 500 फूट अंतरावर त्यांच्या खिशातील 77 हजार रुपयाची रक्कम काढून घेतली.

दुसर्‍या खिशातील दोन हजारांच्या तीन नोटा तशाच खिशात राहिल्या. सुमारे अर्धा तासाने येवले नामक इसमाने दत्तोबा इथे का थांबला, असे विचारले असता. होले यास शुद्ध आल्यावर खिशातील रकमेची चोरी झाल्याचे लक्षात आले. आरडाओरड केली परंतु तोपर्यंत लुटारू पळून गेले होते. घटनास्थळी राहुरीचे साहयक पोलीस निरीक्षक राक्षे, पो. हे. कॉ. टेमकर यांनी भेट दिली. सीसीटीव्ही फुटेज तपासून होले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.

बँकेचा सुरक्षारक्षक रोखापाल!
बँकेतील सुरक्षा रक्षक बँकेच्या दारात थांबण्याऐवजी रोखपालाला मदत करण्यासाठी रोखपाला जवळ थांबून रोखपाल सांगेल तेवढी रक्कम मोजून बँकेच्या खातेदारांना देण्याचे व आलेला भरणा मोजून घेण्याचे काम करीत असल्याने बँकेचा सुरक्षा रक्षक दरवाजात थांबण्याऐवजी तो रोखपालाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे बँकेची व बँकेतील खातेदारांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com